'BCCI चा कार्यक्रम वाटतो' म्हणणाऱ्या पाकिस्तान कोचला ICC ने दिलं उत्तर, म्हणाले 'काही केलं तरी...'

भारताविरोधातील सामन्यात पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेटचे संचालक मिकी आर्थर यांनी हा सामना म्हणजे बीसीसीआयचा कार्यक्रम वाटत होता असं विधान करत खळबळ उडवून दिली. 

शिवराज यादव | Updated: Oct 17, 2023, 03:31 PM IST
'BCCI चा कार्यक्रम वाटतो' म्हणणाऱ्या पाकिस्तान कोचला ICC ने दिलं उत्तर, म्हणाले 'काही केलं तरी...' title=

World Cup 2023: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वांचं लक्ष असलेला भारत-पाकिस्तान सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा होती. पण भारताच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे सामना एकतर्फी झाला आणि पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ एका क्षणी मजबूत वाटत होता. पण नंतर संघ पत्त्यांप्रमाणे कोसळला आणि उभाच राहू शकला नाही. पाकिस्तान संघ फक्त 191 धावांवर बाद झाला. यानंतर रोहित शर्माने केलेल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर भारताने 7 गडी राखत दणदणीत पराभव केला. 

'BCCI चा कार्यक्रम वाटत होता,' म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या कोचवर अक्रम संतापला, म्हणाला 'तुम्ही आधी कुलदीपला...'

 

हा सामना संपल्यानंतर एकीकडे पाकिस्तानी संघावर टीका होत असताना दुसरीकडे पाकिस्तानचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर यांनी एक अजब विधान केलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला हा सामना बीसीसीआय नव्हे तर आयसीसीने आयोजित केल्याचं वाटत होतं असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू वसीम अक्रम यांनीही त्यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. 

मिकी आर्थर नेमकं काय म्हणाले?

"हे पाहा, खरं सांगायचं तर आजचा सामना हा अजिबात आयसीसीने आयोजित केलेला वाटला नाही. मी खोटं सांगणार नाही. ही द्विपक्षीय मालिका वाटत होती. बीसीसीआयने याचं आयोजन केल्यासारखं वाटत होतं. मला मायक्रोफोनवरुन एकदाही 'दिल दिल पाकिस्तान' ऐकायला मिळालं नाही," असं मिकी आर्थर म्हणाले. 

'जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर...,' माजी कर्णधाराने पाकिस्तानी संघाला झापलं; 'जरा भारताकडून शिका'

"या गोष्टी नक्कीच फरक पाडतात. पण मी हे पराभवाचं कारण म्हणून वापरणार नाही. हा प्रश्न तो क्षण जगण्याचा, पुढील चेंडूचा आणि तुम्ही भारतीय संघ, भारतीय खेळाडूंना कसे सामोरे जाता याचा होता," असंही मिकी आर्थर यांनी सांगितलं. 'दिल दिल पाकिस्तान' हे पाकिस्तानमधील प्रसिद्ध गाणं आहे. 

आयसीसीने दिली प्रतिक्रिया - 

ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. मिकी आर्थर यांच्या विधानावर व्यक्त होताना आयसीसीचे चेअरमन ग्रेग बारक्ले यांनी म्हटलं आहे की, "आम्ही आयोजित केलेल्या प्रत्येक स्पर्धेवर कोणत्यातरी प्रकारे टीका होतच असते". 

"आम्ही ही स्पर्धा सुरु झाल्यापासून ती चांगली आणि उत्तम कशी व्हावी याकडेच लक्ष देत आहोत. ही स्पर्धा आता कशी पार पडते आणि त्यात आम्ही काय बदल करु शकतो याकडे लक्ष देत आहोत. वर्ल्डकप स्पर्धा आणखी चांगली कशी करता येईल, काय सुधारणा करता येईल हेदेखील पाहू," असं ते म्हणाले आहेत. हा एक सर्वोत्तम वर्ल्डकप ठरेल याची आम्हाला खात्री आहे असा विश्वास ग्रेग यांनी व्यक्त केला आहे. 

वसीम अक्रमने सुनावलं

मिकी आर्थर यांच्या विधानावरुन वाद पेटला असून पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गद खेळाडू वसीम अक्रम यानेही यावरुन नाराजी जाहीर केली आहे. पाकिस्तानमधील एका स्पोर्ट्स चॅनेलवर चर्चा करताना त्याने मिकी आर्थर यांना खडे बोल सुनावले. "या वक्तव्याचं नेमकं काय करायचं हे मला समजत नाही आहे. तुमच्याकडे कुलदीप यादवविरोधात काय योजना आहे ते आम्हाला सांगा, आम्हाला ते ऐकायचं आहे. इतर चर्चांमध्ये आम्हाला रस नाही. अशी विधानं करुन तुम्ही हे टाळू शकता असं तुम्हाला वाटत आहे का? दुर्दैवाने ते शक्य नाही," अशी टीका वसीम अक्रमने संतापून केली. 

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना पूर्ण 50 ओव्हरही खेळू शकला नाही. 155 धावांवर 2 बाद नंतर पाकिस्तान संघ 191 धावांवर गारद झाला. भारताने अत्यंत सहजपणे या लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची जबरदस्त खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. भारताने 7 गडी राखून हा सामना जिंकला.