T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'

विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 5, 2024, 08:24 PM IST
T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...' title=

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) विजेत्या संघाशी संवाद साधला. यावेळी विराट कोहलीने (Virat Kohli) अंतिम सामन्यात आपल्या नेमक्या काय भावना होत्या हे सांगितलं आहे. आपण पूर्णपणे खचलेलो असताना आणि आत्मविश्वास नसताना प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) आपल्यावर विश्वास दाखवला असं विराट कोहलीने यावेळी सांगितलं. तसंच मैदानात फलंदाजीला जाताना आणि पहिल्या ओव्हरनंतर रोहित शर्माशी (Rohit Sharma) काय संवाद साधला हेदेखील नरेंद्र मोदींना सांगितलं. 

दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात 76 धावांची खेळी कऱणाऱ्या विराट कोहलीला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे विराट कोहली संपूर्ण स्पर्धेत अयशस्वी ठरला होता. अंतिम सामन्याआधी त्याने एकूण 75 धावा केल्या होत्या. पण संघाला जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने जबरदस्त फलंदाजी करत संकटातून बाहेर काढलं. 

"सर्वप्रथम, आम्हाला येथे आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. तो दिवस माझ्या आठवणीत कायम राहील कारण मी या स्पर्धेत संघासाठी फारसे योगदान देऊ शकलो नाही. मी राहुल द्रविड भाईला देखील सांगितलं होतं की, मी संघाला आणि स्वत:ला फार न्याय देऊ शकलेलो नाही. पण त्यांनी मला सांगितलं की, जेव्हा संधी येईल तेव्हा तू नक्की परफॉर्म करशील. जेव्हा मी आणि रोहित फलंदाजीसाठी जात होतो तेव्हाही मी रोहितला मला फार आतविश्वास असल्यासारखं वाटत नसल्याचं सांगितलं होतं. पण जेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये तीन चौकार लगावले, तेव्हा रोहितला हे काय सुरु आहे असं विचारलं. एक दिवस मला एकही धाव मिळत नाही आणि आता एका षटकात तीन चौकार मिळाले," असं कोहलीने पंतप्रधान मोदींशी बोलताना सांगितलं.

विराट कोहलीने यावेळी आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट एखाद्या परीकथेप्रमाणे होता असं सांगितलं. खासकरुन जेव्हा आमच्या विकेट्स लवकर पडत होत्या ते पाहता ते स्वप्नवत होतं असं तो म्हणाला. "आम्ही तीन विकेट गमावल्यानंतर, माझं ध्येय संघ आणि संघासाठी जे योग्य आहे त्यावर लक्ष केंद्रीत करणं होतं. मला असं वाटलं की मला त्या परिस्थितीत टाकण्यात आलं आहे. भावना स्पष्ट करणे कठीण आहे. काही गोष्टी घडणारच असतात," अशा भावना विराट कोहलीने व्यक्त केल्या. 

विराट कोहलीने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान आपण एकदिवसीय आणि कसोटी खेळत राहणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.