Competition Guardian Ministership: देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप झालंय. त्यानंतर लगेचच पालकमंत्रिपदावरून दावे प्रतिदावे करण्यात येतायेत. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्येच पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु झालीये.
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप झालं. मात्र, खातेवाटप होताच महायुतीत पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री झाल्यानंतर लगेचच संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावर दावा केलाय.
तिकडे रायगडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून दावे प्रतिदावे सुरू झालेत. राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकलाय.दरम्यान नावाची अधिकृत घोषणा होईपर्यंत पालकमंत्रिपदावर कोणीही दावा करु शकत, असं शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाईंनी म्हटलंय. दोन दिवसांत पालकमंत्रिपदाचं वाटप होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्याच रस्सीखेच आहे. रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात स्पर्धा आहे. इथे तर आपणच पालकमंत्री होऊ, असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय. पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात स्पर्धा आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात तर बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या प्रमुख नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान ठाण्याचं पालकमंत्रिपदं फक्त एकनाथ शिंदे यांनाच मिळावं अशी मागणी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीय. महायुतीच्या मंत्रिमंडळात 12 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित आहेत..मात्र, आपल्यात कुठलाही वाद होणार नसून पालकमंत्रिपदाचं वाटप होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. खातेवाटप जाहीर होताच महायुतीत सुरू झालेल्या पालकमंत्रिपदाच्या वादावर महायुतीचे नेते कशाप्रकारे तोडगा काढतात आणि पालकमंत्रिपद नेमकं कुणाला दिलं जाणार हे यादी जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. मी मंत्री होणार हे ठाम विश्वासाने सांगणारे आमदार भरत गोगावले मंत्री झाले. दरम्यान आता त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दावा केलाय. इथल्या पालकमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही. मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार, असा दावा भरत गोगावले यांनी केला. शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री आमचाच होणार असे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिले आहे.