'तुमची न संपणारी...', WC मध्ये भिडण्याआधी शिखर धवनने उडवली पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली

वर्ल्डकप स्पर्धेतील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. यादरम्यान भारतीय फलंदाज शिखर धवनने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. त्याने एक्सवर ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 3, 2023, 07:36 PM IST
'तुमची न संपणारी...', WC मध्ये भिडण्याआधी शिखर धवनने उडवली पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली title=

वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून, सध्या सर्व संघ सरावावर लक्ष केंद्रीत करत आहेत. 5 ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार असून, त्याआधी सर्व संघ सराव सामने खेळत आपली कितपत तयारी झाली आहे, याचा आढावा घेत आहेत. या स्पर्धेत सर्वांचं लक्ष भारत-पाकिस्तान सामन्यावर असणार आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहते आतुरतने या सामन्याची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर तर अनेक चाहते आतापासून आपापसात भिडत आहेत. यादरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखर धवनने एक्सवर एक पोस्ट शेअर करत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. 

पाकिस्तानं संघाने मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरोधात सराव सामना खेळला. या सामन्यात पाकिस्तानी संघाला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. सामन्यातील अशाच खराब क्षेत्ररक्षणाचा एक व्हिडीओ शिखर धवनने शेअर केला असून पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. पाकिस्तान संघाचं क्षेत्ररक्षण अनेकदा खिल्लीचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत.

शिखर धवनने शेअर केलेल्या व्हिडीओत दोन खेळाडू सीमेपार जाणाऱ्या चेंडूच्या मागे धावताना दिसत आहेत. पण शेवटी दोघेही एकमेकांची वाट पाहत चेंडू सोडून देतात आणि अखेर तो दोघांच्या मधून जात सीमेपार जातो. हा व्हिडीओ शेअर करताना शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "पाकिस्तान आणि क्षेत्ररक्षण ही एक न संपणारी प्रेमकथा आहे".

याआधी, पाकिस्तानचा फिरक गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू शादाब खान याने म्हटलं होतं की, भारताच्या फलंदाजीला अनुकूल असणाऱ्या या खेळपट्ट्यांवर धावा रोखण्यास सक्षम असणारे गोलंदाज पाकिस्तान संघाकडे आहेत. 

शादाब खान पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीचं नेतृत्व करत असून, विकेट मिळवण्यात अपयशी ठरत असल्याने टीकेचा धनी ठरला आहे. आशिया कपमध्येही शादाब 5 सामन्यात फक्त 6 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला होता. यातील 4 विकेट्स त्याने नेपाळविरोधात मिळवले होते. पण वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी गोलंदाज पुनरागन करतील असा विश्वास शादाब खानने व्यक्त केला आहे. 

"मला वाटतं ज्या संघाकडे सर्वोत्तम गोलंदाज असतील, ते वर्ल्डकप जिंकतील. कारण या मैदानांवर मोठी धावसंख्या उभी राहणार आहे," असं शादाबने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. दरम्यान न्यूझीलंडविरोधात झालेल्या पहिल्या साव सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव झाला.