Kokan Politics : बाप बाप होता है.. झुंड में तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है... शिवसेना शिंदे गटाचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपनं लावलेले हे बॅनर... या भल्यामोठ्या बॅनरवर भाजप खासदार नारायण राणेंचा फोटो (Uday Samant vs Narayan Rane) झळकतोय. सिंधुदुर्गापाठोपाठ आता रत्नागिरीतही महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर रंगलेलं दिसतंय. उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो असलेला बॅनर सिंधुदुर्गात झळकला होता. वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे... अशी डायलॉगबाजी त्यावर होती. सामंत समर्थकांच्या डायलॉगबाजीला राणे स्टाईलनं उत्तर देणारा भाजप समर्थकांचा बॅनर आता रत्नागिरीच्या रस्त्यावर झळकतोय.
माझ्या घरासमोर बॅनर लावल्यानं मला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी व्यक्त केलीय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना बॅनरबाजीतून डिवचत असताना उदय सामंतांनी काहीशी सामंजस्याची भूमिका घेतलीय. हा बॅनर शिवसेना ठाकरे गटासाठी असल्याचा दावा सामंतांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतला संघर्ष टाळण्याचा उदय सामंतांचा प्रयत्न आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतच राणे विरुद्ध सामंत यांच्यात राजकीय शिमगा रंगला.. नारायण राणे खासदार झाल्यानंतर त्यात आणखी भर पडलीय. सिंधुदुर्ग रत्नागिरीत रंगलेली बॅनरबाजी हे कोकणातल्या धूमशानाचं जिवंत उदाहरण, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दरम्यान, रत्नागिरीमध्ये देखील बॅनर लावण्यात आल्यामुळं आगामी निवडणुकांपर्यंत महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये जोरदार संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे. लोकसभेत मतभेद विसरुन उदय सामंत आणि नारायण राणे यांनी काम केले. त्यामुळे नारायण राणे विजयी झाले. परंतु आता बॅनरच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते समोरासमोर येत असल्याने आता महायुतीची चिंता वाढलीये.