Paytm First Advertisement: मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी त्याची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी झाली नाही. आयपीएलमध्ये देखील त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. सध्या तो आपल्याला पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.
आमदार बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. सचिन तेंडुलकरच्या पेटीएम फर्स्ट जाहिरातीसंदर्भात त्यांच्याकडे प्रितेश पवार नावाच्या तरुणाने तक्रार केली आहे. यानंतर बच्चू कडू यांनी सचिनला ही जाहिरात बंद करण्याचे आवाहन केले आहे.
सचिन तेंडुलकरने जुगार चालवणार्या अॅपची जाहीरात करणे योग्य नाही, असे यात ते म्हणाले आहेत. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहे. त्यांचे देशासह जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याहून विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.
भारतरत्न असणार्या व्यक्तिने पेटीएम फर्स्ट सारख्या जुगार चालवणार्या अॅपची जाहीरात करणे योग्य नाही. माझी महाराष्ट्र शासन आणि सचिन तेंडुलकर यांना विनंती आहे, कृपया या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी., असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.
सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहे. असंख्य चाहते व भारतरत्न असणार्या व्यक्तिने Paytm First सारख्या जुगार चालवणार्या app ची जाहीरात करणे योग्य नाही आहे. माझी महाराष्ट्र शासन व सचिन तेंडुलकर यांना विनंती आहे कृपया या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.@sachin_rt pic.twitter.com/nhozmLbIn7
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) July 15, 2023
पेटीएम फर्स्टमधून रम्मी सारखे गेम ओपन होतात. अशातून लोकांची फसवणूक झाल्याच्या तसेच काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. या कारणांमुळेच आंध्र प्रदेश,आसाम, अरुणाचल प्रदेश, तेलंगणामध्ये या गेमला बंदी आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरने जुगार चालवणार्या अॅपची जाहीरात करणं चुकीचं असल्याचे खुलं पत्र बच्चू कडू यांनी दिलं आहे.
एक छोटा क्रिकेटर नेट प्रॅक्टीस दरम्यान आपला खेळ सोडून दुसऱ्यांना चिअर करत असतो. त्याच्या कोचला हे समजताच ते त्याच्या जोरदार कानाखाली मारतात. आयुष्यभर चिअर करायचंय की खेळायचं पण आहे? असा प्रश्न त्याला विचारतात. यानंतर तो मुलगा खूप अस्वस्थ होता. त्याचा मित्र त्याला दुसऱ्या कोचकडे प्रॅक्टीससाठी घेऊन जातो. पण तो मुलगा पुन्हा आपल्या कोचकडे परततो आणि सर मला खेळायचंय..असे म्हणतो. त्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे असते असते सांगत सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्टची जाहिरात करताना दिसतो.