या खेळाडूला काढून चूक केली, विराट कोहलीची कबुली

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला.

Updated: Aug 13, 2018, 04:53 PM IST
या खेळाडूला काढून चूक केली, विराट कोहलीची कबुली title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. इनिंग आणि १५९ रननी भारताला हार पत्करावी लागली. याचबरोबर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. चौथ्या दिवशी जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडनं जबरदस्त बॉलिंग करत भारतीय बॅट्समनची भंबेरी उडवली. अंडरसननं २३ रन देऊन ४ विकेट तर ब्रॉडनं ४४ रन देऊन ४ विकेट घेतल्या. दुसऱ्या इनिंगप्रमाणेच पहिल्या इनिंगमध्येही इंग्लंडच्या फास्ट बॉलरपुढेच भारतीय बॅट्समननी लोटांगण घातलं. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा १०७ रनवर तर दुसऱ्या इनिंगमध्ये १३० रनवर ऑल आऊट झाला.

या मॅचनंतर कर्णधार विराट कोहलीनं प्रतिक्रिया दिली आहे. लॉर्ड्सवर आम्ही पराभवाच्या लायकच होतो, असं विराट कोहली म्हणाला. तसंच टीम निवडीमध्ये आमची चूक झाल्याची कबुली विराटनं दिली आहे. उमेश यादवला वगळून दोन स्पिनर घेणं ही चूक होती, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली. दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं उमेश यादवऐवजी कुलदीप यादवला संधी दिली होती.

लॉर्ड्सवर पहिल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ फुकट गेला. पहिल्या दिवशी टॉसही पडला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून मॅच सुरु झाली. दुसऱ्या दिवशीही लॉर्ड्सवर ढगाळ वातावरण होतं. ढगाळ वातावरणात फास्ट बॉलरला फायदा मिळतो. हे माहित असताना देखील उमेश यादवला वगळून कुलदीप यादवला का संधी देण्यात आली असा प्रश्न विराटला विचारण्यात आला होता. या टेस्ट मॅचमध्ये कुलदीप यादवनं ९ ओव्हरमध्ये ४४ रन तर अश्विननं १७ ओव्हरमध्ये ६८ रन दिले. या दोन्ही स्पिनरना एकही विकेट मिळाली नाही.

दुसऱ्या टेस्टदरम्यान विराट कोहलीच्या पाठीला दुखापत झाली होती. मॅचच्या तिसऱ्या दिवशी काही काळ आणि चौथ्या दिवशी विराट फिल्डिंगला आला नव्हता. त्यामुळे नेहमी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येणाऱ्या विराटला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला यायला लागलं. विराटऐवजी अजिंक्य रहाणे बॅटिंगला आला होता. तिसऱ्या टेस्टआधी आपण फिट होऊ, असा विश्वास विराट कोहलीनं बोलून दाखवला. १८ ऑगस्टपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x