IPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती

IPL 2025 :  रविवारी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना IPL 2025 सुरु होण्याची तारीख जाहीर केली. 

पुजा पवार | Updated: Jan 12, 2025, 06:49 PM IST
IPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला लवकरच सुरुवात होणार आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव पार पडला यात जवळपास 182 खेळाडूंना फ्रेंचायझींनी संघात घेतले. हे खेळाडू आता आयपीएल 2025 साठी सराव देखील करत आहेत. रविवारी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, रविवारी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना IPL 2025 सुरु होण्याची तारीख जाहीर केली. 

रविवारी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर तर आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर बीसीसीआय सचिव आणि कोषाध्यक्ष ही दोन पदे रिक्त होती. या बैठकीत देवजित सैकिया आणि प्रभतेज सिंग भाटिया यांची अनुक्रमे BCCI चे नवे सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. रविवारी बैठक संपल्यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयपीएल 2025, 23 मार्च पासून सुरु होणार असल्याचे सांगितले. तर फायनल सामना हा 25 मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होईल. 

सौदी अरेबियात पार पडलं आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन : 

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) या जगप्रसिद्ध टी 20 लीगसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथे मेगा ऑक्शन पार पडलं. मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 577 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी केवळ 182 खेळाडू संघांनी विकेट घेतले. या खेळाडूंना विकत घेण्यासाठी जवळपास 639. 15 कोटी रुपये फ्रेंचायझींनी खर्च केले. यंदाही स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असणार आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केव्हा जाहीर होणार भारतीय संघ? 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 येत्या 19 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर याचा शेवटचा सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येईल. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 12 जानेवारी पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची मुदत देण्यात आलेली होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीकडे ही मुदत वाढवून मागितली असून राजीव शुक्ला यांच्या माहितीनुसार बीसीसीआय 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करेल.