Beed Crime News : बीडमधून दररोज नवनवीन आणि तितक्याच धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्यानं याप्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत. वाल्मिक कराड प्रकरणात नुकतंच गोट्या गित्तेचं नाव समोर आलं होतं. आता याच गोट्या गित्तेबद्दल अंजली दमानियांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. गोट्या गित्ते मुलींना घरातून नेऊन फेकून देतो असं एका महिलेनं आपल्याला सांगितल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानियांनी केलाय. ही माहिती पोलीस अधिक्षकांनाही दिल्याची माहिती दमानियांनी दिलीय.
गोट्या गित्ते हा कोणी टपराट चोर नाही. तर गोट्या गित्ते हा कुख्यात गुन्हेगार आहे. याच गोट्या गित्तेकडं 40-40 कट्टे सापडले होते. एवढंच नाही तर त्यानं देहूतल्या तुकोबारायांच्या मंदिरातला मुखवटाही चोरला होता. गोट्या गित्तेच्या गुन्ह्यांची कुंडली फार मोठी आहे. गोट्या गित्तेवर गेल्या 15 वर्षांपासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चो-या करणं, लोकांना धमकावणं गावठी कट्टे बाळगणं यासह हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात गोट्या गित्तेचं नाव आलं होतं.
वाल्मिक कराडला 31 डिसेंबरला सीआयडी केज कोर्टात नेत असताना पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते होता. गोट्या गित्तेचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. त्यानंतर बीडच्या गुन्हेगारी जगतामधील आणखी एक चेहरा समोर आला. तपासातून बीडमधील गुन्हेगारी विश्वातील आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे. गोट्या गित्तेच्या माध्यमातून वाल्मिकनं दहशत पसरवली. गोट्याचा एक मोहरा म्हणून वापर करण्यात आला. असे अनेक मोहरे वाल्मिक कराडनं जमवले आहेत. त्यामुळे येत्या काळात बीडमधून अशा अनेक गोट्या गित्तेंची नावं समोर आली तर आश्चर्य वाटायला नको.