Makar Sankranti Bhogi 2025 : नवीन वर्षातील पहिला सण येत्या मंगळवारी 14 जानेवारी 2025 ला साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी हा सण साजरा करण्यात येतो. भोगीचा सण हा 13 जानेवारी 2025 साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी हिवाळ्यात मिळणाऱ्या हंगामी भाज्यांची मिक्स भाजी करण्यात येते. या भोगीच्या भाजीसोबत एक विशेष भाकरीदेखील खाल्ली जाते. या मिक्स भाजीला जिला भोगी असंही म्हटलं जातं. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. अशात बोचरी थंडीला सुरुवात होते. या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात भोगी साजरी केली जाते. भोगी सणामागील परंपरा, प्रथा आणि शास्त्रीय कारण जाणून घेऊयात.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीचा अर्थ समजून घेऊयात. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो.
बाजारात उपलब्ध असलेल्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी भाज्या या अनेक रोगांपासून आपलं संरक्षण करतात. मकर संक्रांतीपासून थंडीचा जोर वाढतो. अशास्थितीत अनेक रोगराईदेखील पसरतात. त्यामुळे या दिवशात आपलं संरक्षण व्हावं यासाठी भोगी आणि मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. कारण हिवाळ्यातील या भाज्या एकत्र खाल्ल्यास रोगराईपासून आपलं संरक्षण होतं. महाराष्ट्रात एक म्हण आहे, जो न खाई भोगी तो सदा रोगी...खरं तर हा सण म्हणजे नात्यांमधील ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी असा त्यामागील उपदेश आहे.
असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं, त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जातं. इंद्रदेवाकडे पृथ्वीवर अमाप पिक पिकावीत अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. याच पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली, अनेकांना समृद्ध करत आली, अशी कथा आहे. हेच चक्र अविरतपणे चालत रहावं या हेतूनं भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
शास्त्रात सांगितलंय की, यादिवशी केस धुवावेत. यामागे कारण असं आहे की, केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींवर मात करावी. तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते.
भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी करण्यात येते. एकट्या महाराष्ट्रातच भोगीच्या दिवसाची अनेक रुपं तुम्हाला पाहिला मिळतील. कोकण, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या प्रकारे साजरी होते. अगदी भोगीची भाजी करण्याची पद्धतीही वेगवेगळी आहे.
थंडीत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध होतात. त्यामुळं या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. तसंच, या भाजीबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरीही उष्ण असल्याने ती शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते. भोगीच्या भाजीमध्ये वांगे, घेवडा, हरभरा, तरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा, पावटे या भाज्यांसारख्या थंडीत उपलब्ध होणार्या भाज्या वापरल्या जातात. तसंच, त्या व्यतिरिक्त भाजीत तीळ, शेंगदाणा, खोबरं आणि खसखस या उष्ण पदार्थांचा वापर जातो. हिवाळ्यात ही भाजी खूप आरोग्यदायी मानली जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)