IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सचे फलंदाज रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना सुनावलं आहे. कोलकाताविरोधातील सामन्यात दोघांनी सेट होण्यासाठी फार वेळ घेतल्याने आणि तरीही जास्त योगदान न देता आपली विकेट गमावल्याने खडेबोल सुनावले आहेत. पावसाने व्यत्यय आणल्याने या सामन्यातील ओव्हर्स कमी करण्यात आल्या होत्या. आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी असणाऱ्या या दोन्ही संघांमधील सामन्यात रोहित शर्माने 24 चेंडूत 19 आणि 14 चेंडूत फक्त 11 धावा केल्या. कोलकाताने मुंबईसमोर या सामन्यात 158 धावांचं आव्हान दिलं होतं. ईशान किशनने 22 चेंडूत 40 धावा करत स्फोटक सुरुवात करुन दिली होती.
"जो कोणी चांगली गोलंदाजी करतो, त्याच्याविरोधात चांगली खेळी करा. जर दोन विकेट पडल्या नसत्या तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव एक षटक आधी सामना संपवू शकले असते. वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांना असंही गोलंदाजी करायची असते. जर त्यांनी स्पिनर्सना खेळून काढले आणि विकेट गमावल्या नसत्या जर जिंकले असते. जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी उतरता तेव्हा तुमच्यात अहंकार असू शकत नाही. तुम्ही खराब चेंडूवर शिक्षा दिली पाहिजे,” असं विरेंद्र सेहवागने Cricbuzz वर सांगितलं.
पहिले दोन विकेट लवकर गेल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात संघर्ष करताना दिसला. वेकंटेश अय्यरने फलंदाजी करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची लय बिघडवली. नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंग आणि रामदीप सिंग यांनी छोटी पण स्फोटक खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. कोलकाताने 7 गडी गमावत 157 धावा केल्या.
यानंतर मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने 17 चेंडूत 32 धावा केल्या. पण त्याला कोणीही साथ न दिल्याने खेळी वाया गेली. हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, नेहाल यांनी योगदान दिलं नाही. नमन धीरने 6 चेंडूत 17 धावा करत मुंबईच्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण मुंबई इंडियन्स फक्त 139 धावा करु शकला.
"नमन धीर अगदी शेवटी आला आणि त्याने दोन षटकार आणि एक चौकार मारला. जर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव त्यावेळी सेट झाले असते तर त्यांनी 5 चेंडूवर चौकार मारले असते.तुम्ही रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार यादव असू शकता, पण जर गोलंदाजाचा आदर करु शकत नसाल तर डिलिव्हरीचा आदर करा. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव महान खेळाडू आहेत यात वाद नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगले चेंडूही मारले पाहिजेत", असं सेहवागने सांगितलं आहे.