IPL 2024: गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) चांगलीच प्रसिद्धी मिळाली, क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू म्हणून उदयास आला आहे. भारतीय क्रिकेटने जगाला दिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये रोहित शर्माची गणना होत असून, त्याची नव्याने ओळख करुन देण्याची अजिबात गरज नाही. त्यात सध्याच्या आयपीएल (IPL) हंगामात रोहित शर्मा हे नाव फारच चर्चेत आहे. ही आयपीएल स्पर्धा रोहित शर्माच्या लौकिकाला अपेक्षित झालेली नाही. त्यात मुंबई संघ आया प्लेऑफमध्ये न पोहोचताच बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले असून, रोहित शर्माही आपल्या खेळाने संघाचं मनोबल वाढवू शकलेला नाही. एकीकडे रोहित शर्मावरही टीका होत असताना पंजाब बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्स संघाची सह-मालकीण प्रीती झिंटाने (Preity Zinta) रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
एक्सवर एका क्रिकेट चाहत्याने प्रीती झिंटाला रोहित शर्माचं एका शब्दात वर्णन करण्यास सांगितलं. त्यावर प्रीती झिंटाने दिलेल्या उत्तराने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलं. रोहित शर्मा म्हणजे 'प्रतिभासंपन्न' (a powerhouse of talent) असल्याचं प्रीती झिंटाने म्हटलं आहे.
A powerhouse of talent. https://t.co/tOMq5p8Cxx
— Preity G Zinta (@realpreityzinta) May 6, 2024
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये 11 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. यामुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असून आता ते प्लेऑफमधून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. सोमवारी मुंबई इंडियन्स हैदराबादशी भिडणार आहे. आता उर्वरित सामने जिंकत मुंबई इंडियन्स संघाचा किमान गुणतालिकेत वरच्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न असेल.
मुंबई इंडियन्स संघाला या आपलीएल हंगामात सुरुवातीपासूनच टीकेचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले होते. यामुळे पहिल्या सामन्यापासूनच मुंबई इंडियन्स संघ टीकाकारांचं लक्ष्य झाला होता. त्यात संघाच्या पराभवांनी यात भर टाकली आहे. मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही सामन्यात सांघिक कामगिरी पाहता आलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं हे एक मुख्य कारण ठरलं आहे.
मुंबई इंडियन्सच्या खात्यात 11 सामन्यानंतर फक्त 6 गुण आहेत. मुंबईचा आता उर्वरित 3 सामने जिंकण्याचा प्रयत्न असेल. तसंच इतर संघाचे निकाल आपल्या बाजूने गेले नाही तरी लाजिरवाण्या पद्धतीने जावं लागू नये अशी आशा असेल. मुंबई इंडियन्स सलग चार पराभवांसह सामन्यात उतरत आहे. त्यांचा फॉर्म लक्षात घेता, हार्दिक पांड्याच्या आता किमान संघाचा अभिमान कायम राखण्यासाठी सामने जिंकावे लागतील.