Virat Kohli IPL Team: विराट कोहलीला (Virat Kohli) पुन्हा एकदा लय गवसली असून तो सध्या तुफान कामगिरी करत आहे. आतापर्यंत त्याने यंदाच्या वर्षातील पहिल्या चार वनडे सामन्यांमध्ये दोन शतकं ठोकली आहे. त्यामुळे आता या वर्षी आयपीएलसहीत (IPL Team) एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र अशातच विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबद्दलची (RCB) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीमचं ट्विटर अकाऊंट हॅक (Twitter Account Hacked) झालं आहे.
हॅकर्सने आरसीबीच्या ट्विटर खात्याचं नाव आणि लोगो बदलला आहे. हा मागील तीन वर्षांमधील आरसीबीच्या खात्यावर झालेला तिसरा सायबर हल्ला आहे. यापूर्वी 2021 मध्ये ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर 2022 रोजी त्यांच्या युट्यूब अकाऊंटवरही सायबर हल्ला झाला होता. फ्रेंचायझीने नुकत्याच झालेल्या सायबर हल्ल्यासंदर्भातील माहिती जारी करणारं एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकामधून आरसीबीने अकाऊंट हॅक झाल्यासंदर्भातील माहिती दिली आहे. संघ व्यवस्थापनाने आवश्यक ती पावलं उछलली आहे. लवकरच या समस्येवर तोडगा निघेल अशी अपेक्षा आरसीबीने जारी केलेल्या पहिल्या पत्रकात म्हटलं आहे. हॅकर्सने आरसीबीच्या ट्विटर हॅण्डलवरील नाव बदलून 'बोरड अॅप यॉट क्लब' असं ठेवलं आहे.
इतकंच नाही तर आरसीबीच्या ट्विटर अकाऊंटवरुन एनएफटी (NFT) म्हणजेच नॉन फंजीबल टोकन विकण्याचाही प्रयत्न हॅकर्सने केला आहे. हॅकर्सने चार वेगवेगळे टोकनही अपलोड केले आहेत. आरसीबीने जारी केलेल्या पत्रकामध्ये 21 जानेवारी 2023 रोजी पहाटे चारच्या सुमारास आरसीबीचं ट्विटर हॅण्डल हॅक करण्यात आलं. काही वेळ या खात्यावर हॅकर्सचं नियंत्रण होतं, असंही आरसीबीने स्पष्ट केलं.
आरसीबीने ट्विटर हॅण्डल पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र सुरक्षेसंदर्भातील सर्व यंत्रणा हॅकर्सने ताब्यात घेतल्या होत्या असं आरसीबीने म्हटलं आहे. आम्ही आमच्या ट्वीट किंवा रिट्वीटवरुन करण्यात आलेल्या पोस्टचं समर्थन करत नाही. चाहत्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही माफी मागतो. आम्ही या विषयावर तोडगा काढण्यासाठी ट्विटर सपोर्ट टीमबरोबर काम करत आहोत. आम्ही लवकरच परत येऊ, असा विश्वास आरसीबीने व्यक्त केला आहे.
आरसीबी 2009 पासून ट्विटरवर सक्रीय आहे. आरसीबीचे ट्विटरवर एकूण 6.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. यापूर्वी सप्टेंबर 2021 रोजीही या खात्यावर हल्ला करण्यात आला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आयपीएलमधील आरसीबीचे सामने सुरु होण्याची शक्यता आहे.