IPL 2023 : रिंकू सिंहच्या 5 षटकारांचा बदला घेणार? गुजरातसमोर आज पुन्हा कोलकाताचं आव्हान

आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना खेळवला जात आहे. यात पहिला सामना आहे तो गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येतायत.

Updated: Apr 29, 2023, 02:52 PM IST
IPL 2023 : रिंकू सिंहच्या 5 षटकारांचा बदला घेणार? गुजरातसमोर आज पुन्हा कोलकाताचं आव्हान title=

IPL 2023 KKR vs GT Playing 11: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2023) आज हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्ससमोर (GT) नितेश राणाच्या कोलकाता नाईट रायडर्सचं (KKR) आव्हान आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्स सलग चार पराभवानंतर गेल्या सामन्यात आरसीबीला हरवत स्पर्धेत कमबॅक केला आहे. तर गुजरातने गेले दोन्ही सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये टॉप फोरमध्ये आपली जागा बनवली आहे. 

5 षटकारांचा बदला घेणार?
कोलकाता आणि गुजरातचा संघ यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. गेल्या सामन्यात चुरशीच्या लढतीत कोलकाताने गुजरातचा पराभव केला होता. अखेरच्या षटकात कोलकाताच्या रिंकू सिहंने यश दयालच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार ठोकत गुजरातच्या हातातून विजय खेचून आणला होता. आता आजच्या सामन्यात गुजरात रिंकू सिंहच्या या पाच षटकारांचा बदला घेणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

कोलकाताची डोकेदुखी
कोलकाताने गेल्या सामन्यात आरसीबीचा पराभव केला असला तरी त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे संघाचे दिग्गज खेळाडू आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यंदाच्या हंगामात सपशेल फ्लॉप ठरले आहेत. या दोघांनी आतापर्यंत खेळलेल्या एकाही सामन्यात मॅचविनिंग कामगिरी केलेली नाही. असं असलं तरी कोलकात्याला जेसन रॉयच्या रुपात ट्रंप कार्ड मिळालं आहे. इंग्लंडच्या या आक्रमक फलंदाजाने गेल्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकत केकेआरपला जिंकू दिलं होतं. 

आयपीएल पॉईंटटेबल
आयपीएलच्या पॉईंटटेबलमध्ये कोलकाता सातव्या स्थानावर आहे. पण प्लेऑफचं गणित त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. पुढच्या सहा पैकी पाच सामन्यात विजय मिळवला तर केकेआरला प्लेऑफचं तिकिट मिळू शकणार आहे. पण गुजरातचं आव्हान केकेआरसाठी सोप नाहीए. गुजरातची गोलंदाजी हे त्यांच्या संघाचं प्रमुख बलस्थान आहे. गुजरात सध्या सातपैकी पाच सामने जिंकत तिसऱ्या स्थानावर आहे. 

गुजरातची मजबूत गोलंदाजी
गुजरातची गोलंदाजी भक्कम आहे. गुजरातकडे मोहम्मद शमीसारखा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. तर पॉवरप्लेमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याची उपयोग ठरतोय. याशिवाय अनुभवी राशिद खान आणि नूर अहमदचा सामना करणं भल्या भल्या फलंदाजांना आव्हानात्मक ठरतंय. फलंदाजीतही शुभमन गिल, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया जबरदस्त फॉर्मात आहेत. 

कोलकाता संभाव्य प्लेईंग 11
एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर/सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर), नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, डेविड वीस, वैभव अरोडा, सुनील नरेन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती

गुजरात संभाव्य प्लेईंग 11
ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल/ जोश लिटिल (इम्पॅक्ट प्लेयर), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद आणि मोहित शर्मा.