ऑस्ट्रेलियात भारताचा स्टार फलंदाज ड्रेसिंग रुममधील माहिती करत होता लीक? गौतम गंभीरचा आरोप; रिपोर्टमुळे खळबळ

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) कामाचं मूल्यमापन होण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 15, 2025, 10:02 PM IST
ऑस्ट्रेलियात भारताचा स्टार फलंदाज ड्रेसिंग रुममधील माहिती करत होता लीक? गौतम गंभीरचा आरोप; रिपोर्टमुळे खळबळ title=

भारत-ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान (Border Gavaskar Trophy) भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील अनेक गोष्टी बाहेर येत असल्याचे रिपोर्ट आणि अफवा समोर आल्या होत्या. दरम्यान भारताने 1-3 ने मालिका गमावल्यानंतर आता याची गांभीर्याने छाननी केली जाणार आहे. नुकतंच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची बीसीसीआयच्या मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. यादरम्यान न्यूज 24 ने एक धक्कादायक दावा केला आहे, ज्यानुसार गौतम गंभीरने सरफराज खानवर नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यात ड्रेसिंग रुममधील माहिती लीक केल्याचा आरोप केला आहे.  या रिपोर्टवर गौतम गंभीर किंवा सरफराज खानने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 

2014-15 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसक  ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान पाच कसोटी मालिकेच्या या दौऱ्यात सरफराजने एकही सामना खेळला नाही. रिपोर्टनुसार, गंभीरने मुंबई येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आढावा बैठकीत सरफराजवर हे आरोप केले आहेत. 

बॉक्सिंग-डे कसोटीतील पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या त्याच्या गोंधळाबद्दलची माहिती सरफराजनेच माध्यमांना लीक केल्याचं गौतम गंभीरने बीसीसीआयच्या भागधारकांना सांगितलं अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. त्यात असंही म्हटलं आहे की, बीसीसीआय भागधारक सरफराजवर नाराज आहेत आणि जोपर्यंत गंभीर संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे तोपर्यंत तो भारताकडून खेळण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान गौतम गंभीरकडे सरफराज खानविरोधात काही पुरावा आहे का? याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर गंभीरवर टीका झाली असून तोदेखील रडारवर आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याचे भविष्यही अडचणीत आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या पदाबाबत निर्णय घेतला जाईल असं वृत्त आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडूही खराब कामगिरीमुळे अडचणीत सापडले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दोघांनाही रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगण्यात आलं आहे. रोहितने मुंबईच्या अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी स्वतःला उपलब्ध करून दिले असलं तरी, कोहलीने अद्याप या विषयावर काही भाष्य केलेलं नाही. 

चॅम्पिअन्स ट्रॉफीपूर्वी भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. पहिला टी-20 सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.