Kapil Dev on R Ashwin Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या सामन्यानंतर अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. गाबा टेस्टनंतर आणखी दोन सामने शिल्लक असतानाही आर अश्विनने मध्यातच निवृत्ती जाहीर करत घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आर अश्विनने आपल्या या निर्णयामागील कारणांचा उलगडाही केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी निर्णयाच्या वेळेवरुन नाराजी जाहीर केली आहे.
गल्फ न्यूजशी संवाद साधताना कपिल देव म्हणाले की, अश्विनने मालिकेच्या मध्यातच निवृत्ती जाहीर केल्याने मी चिडलो होतो. हा निर्णय घेण्यासाठी त्याने सिडनी कसोटीपर्यंत वाट पाहायला हरकत नव्हती असं मत त्यांनी मांडलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आर अश्विनने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचं कौतुकही केलं.
"अश्विन फार खंबीर व्यक्ती आहे. क्रिकेटमध्ये असे खेळाडू असतात हे पाहून बरं वाटतं. जेव्हा त्याने मालिकेच्या मध्यातच निवृत्ती जाहीर केली तेव्हा मी थोडा नाराज झालो होतो. भारताने तयार केलेला हा एक महान क्रिकेटर होता. त्याने खेळात चांगलं योगदान दिलं. मात्र त्याने वाट पाहायला हवी होती आणि हे वेगळ्या पद्धतीने करायचं हवं होतं. पण तरीही त्याने देशासाठी जे केलं ते अविश्वसनीय आहे," असं कपिल देव म्हणाले आहेत.
केवळ कपिल देवच नाही तर त्यांचे माजी सहकारी सुनील गावसकरही अश्विनच्या या कृतीने निराश झाले. दुसरीकडे, माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी म्हणाला की, वरिष्ठ गोलंदाजाचा अपमान" झाला आहे,. तर माजी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी तो दुखावला असल्याचा दावा केला.
बुधवारी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विनने त्याच्या निवृत्तीबद्दल उघडपणे सांगितलं. “मी खूप विचार करतो. आयुष्यात काय करावे. तुम्ही सर्वांना समजून घेणे आवश्यक आहे की, हे सहजतेने घडते. जर एखाद्याला कळले की, त्याचं काम झाले आहे, एकदा ती विचारसरणी आली की, विचार करण्यासारखे काही नाही. लोकांनी खूप काही सांगितले. मला वाटत नाही की ही मोठी गोष्ट आहे,”असं तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला की, “तुम्हाला वाटतं की काय झालं? मी पहिला कसोटी सामना खेळलो नाही. मी दुसरा सामना खेळलो नाही, तिसरा सामना खेळलो नाही. मी पुढचा सामना खेळू शकेन किंवा न खेळू शकेन हे शक्य होते. ही माझ्या सर्जनशीलतेची एक बाजू आहे आणि मी ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी मला वाटले की माझी सर्जनशीलता संपली आहे, म्हणून ती संपली. ते सोपे होते.”
त्याने निरोप सामना न खेळण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दलही भाष्य केले. जर तो संघात त्याच्या स्थानासाठी पात्र नसेल तर तो तो सामना खेळू इच्छित नव्हता असं तो म्हणाला. "जर मी चेंडू घेऊन बाहेर आलो आणि लोक टाळ्या वाजवत असतील तर याचा काय फरक पडेल? लोक त्याबद्दल किती वेळ बोलतील? जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा लोक त्याबद्दल बोलत असत आणि एका आठवड्यानंतर ते विसरून गेले. निरोप घेण्याची गरज नाही. या खेळाने आम्हाला खूप काही दिले आहे आणि आम्ही खूप आनंदाने खेळलो आहोत," असं तो म्हणाला.