मुंबई : माजी क्रिकेटर विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अॅन्ड्रिया हेविट यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॉलिवूड गायक अंकित तिवारी याचे वडील आर के तिवारी यांनी बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये कांबळीच्या पत्नीवर आपल्याला बुक्का मारल्याचा आरोप केलाय. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत अंकित तिवारी याचे वडील एका मुलासोबत दिसत आहेत.
या व्हिडिओत एका लहान मुलाला हाताला धरून ५९ वर्षीय आर के तिवारी अॅन्ड्रियाच्या पाठिमागून जाताना दिसतात. त्यांनी जाणून-बुजून पाठिमागून हात लावल्याच्या संशयावरून अॅन्ड्रिया त्यांना तत्काळ बुक्का मारताना या व्हिडिओत दिसते.
रविवारी गोरेगावच्या इन ऑर्बीट या मॉलमध्ये ही घटना घडली. मॉलमध्ये छेडछाडीच्या संशयावरून अॅन्ड्रियानं राजेंद्र कुमार यांना मारहाण केली. त्यानंतर वडिलांना मारहाण केल्याचा जाब विचारायला गेलेल्या अंकुर तिवारीलादेखील शिवीगाळ आणि धक्का बुक्की केल्याचा अंकुरचा आरोप आहे.
कांबळीदेखील तिवारी कुटुंबावर आगपाखड करताना एका व्हिडिओतून दिसतंय. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीत कैद झाली असून सध्या बांगूरनगर पोलीस त्याची चौकशी करत आहेत.