Hartalika 2024 : रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नम:|
रुद्रो ब्रम्हा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नम:||
रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नम: ||
पार्वतीमातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलंय. तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनीयुक्त असा पती मिळावा म्हणून कुमारीका मुली हे व्रत करतात. तर पती दीर्घायुषी आणि आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात. अशा या व्रताला हरतालिका व्रत पाळलं जातं.
हरतालिका तृतीया ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी करण्यात येते. यंदा शुक्रवारी 6 सप्टेंबरला हरतालिका व्रत असणार आहे. या दिवशी रवियोग आणि बुधादित्य योग निर्माण होणार आहे. तसंच कन्या राशीत चंद्र आणि शुक्राचा संयोग शुभ हा भाग्यशाली असणार आहे. गुरु आणि चंद्राचा नवपंचम योगदेखील हरतालिकेला असणार आहे. या दिवशी दोन नक्षत्राचा संयोगही जुळणार आहे. सकाळी हस्त नक्षत्र आणि संध्याकाळी चित्रा नक्षत्र असणार आहे. ज्योतिषशास्त्रात चतुर्थी आणि तृतीया तिथीचा संयोग हा अत्यंत शुभ मानला जातो.
भाद्रपद शुक्ल पक्षाची तृतीया तिथी ही गुरुवारी 5 सप्टेंबरला 12.21 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3.01 वाजेपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार हे व्रत 6 सप्टेंबरला करण्यात येणार आहे.
हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 06:02 ते 08:33 पर्यंत असणार आहे. 2 तास 31 मिनिटं हा सर्वोत्तम मुहूर्त आणि फलदायी असणार आहे. तसंच संध्याकाळी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ 5.26 मिनिटांपासून ते 6.36 मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभकाळात उपासना केल्याने साधकाला दुप्पट फळ मिळते.
हरतालिका तृतीयेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करावं. 'मम उमामहेश्वर सायुज्यसिद्धये हरतालिकाव्रतमह करिष्ये।' या मंत्राचा जप करून व्रत करण्याचा संकल्प करा.
पूजा घराला छान सजवून 'ओम उमाय पार्वत्याय जगद्धात्रयै जगत्प्रतिस्थायै शांतिरूपिण्यै शिवाय व ब्रह्मरूपिण्यै नमः' या मंत्राचा उच्चार करून पार्वतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा.
'माहेश्वराय', 'शांभवे', 'शूलपाणये', 'पिनाकधृषे', 'शिवाय', 'पाशुपतये' आणि 'महादेवाय नमः' असा जप करून शिवाच्या मूर्तीची स्थापना करा.
त्यानंतर 'देवी देवी उमे गौरी त्राही मां करुणानिधे । ममपराधः क्षान्तव्य भुक्तिमुक्तिप्रदा भव । नामजप करताना उपवास ठेवा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)