www.24taas.com, ठाणे
ठाणे पालिकेतलं शिक्षण मंडळ कायमच या ना त्या कारणामुळं चर्चेत असतं. आता ठाण्यातल्या नौपाडा भागातलं शाळेबाबतचं भीषण वास्तव प्रशासन आणि सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणार आहे. स्वातंत्र्याला साठ वर्ष उलटल्यानंतरही ठाण्यासारख्या शहरात कंटेनरच्या भयाण शाळेत मुलांना शिक्षण घ्य़ावं लागतंय. हे सर्वशिक्षा अभियान आणि सरकारचंही अपयश म्हणावं लागेल.
एकीकडे सरकारकडून शिक्षणासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत तर दुसरीकडे बांधकामाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अक्षरक्ष: कंटेनरमध्ये बसून शिक्षण घेण्याची वेळ आलीय. मात्र, सरकारच्या या अभियानाचाच फज्जा उडाल्याचं चित्रं इथं पाहायला मिळतंय. कारण इथं हे अभियान चालवण्यासाठी शाळेची इमारत नाही. सध्या शाळा भरतेय ती एका कंटेनरमध्ये... पालिकेच्या बांधकामावेळी कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची तात्पुरती व्यवस्था जिथं करण्यात येते त्या कंटेनरमध्ये मुलं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
हे चित्र कुठल्या दुर्गम भागातलं नाही, हे धक्कादायक वास्तव आहे ठाणे जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित अशा नौपाडा भागातलं. इतकंच नाहीतर या छोट्याशा कंटेनरमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. या सर्व इयत्तांमध्ये जवळपास ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याविषयी विचारलं असता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश गडा मात्र या कंटेनरच्या शाळेचं कौतुक करताना दिसत आहेत.
ठाण्यातल्या २० नंबरच्या शाळेच्या धोकादायक इमारतीबाबत ‘झी २४ तास’नं वृत्त प्रसारीत केलं. त्यानंतर शाळेची दूरवस्था दूर करण्याचा निर्णय ठाणे पालिकेनं घेतला. मात्र, शाळा भरवण्यासाठी या बांधकामाच्या कंटेनरऐवजी पालिका हद्दीत जागा मिळाली नाही का? असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळं ठाणे पालिकेनं मुलांच्या भविष्याचा खेळ मांडलाय असं म्हटल्यास वावगं ठरु नये.