मुंबई : 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती 'जातीयवादीं'सोबत नव्हते, असं शरद पवारांनी म्हटलंय.
'छत्रपती शिवाजी राजे आणि शाहू महाराज हे केवळ एका जातीचे अथवा जातीयवादी विचारांचे कधीच नव्हते. अठरा पगड जातींना सोबत घेऊन बहुजनांचे त्यांनी नेतृत्व केले. पण कोल्हापूरचे छत्रपती 'जातीयवादी‘ पक्षाच्या व्यासपीठावर गेले,' अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते. तर पेशवे फडणवीसांची नेमणूक करत होते. पण आता मात्र फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केली, असे वक्तव्य शरद पवारांनी यापूर्वी केले होते. मात्र पवारांनी या वक्तव्याचे पुन्हा जोरदार समर्थन केले आहे. समर्थन करताना शरद पवार म्हणाले, छत्रपती 'जातीयवादीं'सोबत नव्हते, मात्र कोल्हापूरचे छत्रपती 'जातीयवादी' पक्षाच्या व्यासपीठावर गेले.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातला इतिहास बदलण्याचे काम हाती घेतले असून, अशाप्रकारच्या जातीयवाद्यांच्या व्यासपीठावर आपली माणसं दिसताच कशी,' असा सवाल केला. हा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांना लगावला. ते बीडमधील एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बसले होते.
राष्ट्रवादी भवन येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्ला चढवला.