उद्धव ठाकरेच्या अनुपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचं भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचं भूमिपूजन पार पडलं..  

Updated: Oct 11, 2015, 11:31 PM IST
उद्धव ठाकरेच्या अनुपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचं भूमिपूजन title=

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचं भूमिपूजन पार पडलं.. इंदू मिलमधल्या बहुप्रतिक्षित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींनी केलं. या स्मारकाचं काम जनसहभागातून व्हावं असं मोदींनी म्हटलंय. त्यामुळे स्मारकासाठी विविध भागातील जनतेनं झाडं आणून लावावीत असं आवाहन मोदींनी केलं. 

त्यानंतर मोदींनी मुंबईतला मेट्रो प्रकल्प टप्पा २ आणि ७चं भूमीपूजन केलं. तर सर्वात आधी उरण मधल्या जेएनपीटी टर्मिनल चारचंही मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं. देशातलं सर्वात मोठं मालवाहतूक बंदर अशी जेएनपीटीची ओळख आहे. जेएनपीटीच्या टर्मिनल चारसाठी साधारणत: ७ हजार ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

उरण संघर्ष समितीनं दाखवले काळे झेंडे

दरम्यान या भूमिपूजन कार्यक्रमावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदींना विरोध दर्शवला. जेएनपीटी मधल्या प्रकल्पग्रस्तांच्या संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं. वर्षभरापूर्वी नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा निषेध यावेळी संघर्ष समितीनं केला. 

इंदू मिल - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं भूमीपूजन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या इंदू मिल इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं भूमीपूजन झालं. त्याआधी पंतप्रधानांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी पंतप्रधानांसह राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासह भाजपचे विविध नेतेही उपस्थित होते. 

दरम्यान इंदू मिलमध्ये बाबसाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं यासाठी आंदोलन केलेल्या सर्व आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या कार्यक्रमाआधी रिपाईच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

मेट्रो२, मेट्रो-७चं भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतल्या तीन विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा भरगच्च कार्यक्रम पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी मुंबईतला मेट्रो प्रकल्प टप्पा दोन आणि सातचं भूमिपूजन केलं. उत्तर मुंबईतलं दहिसर ते अंधेरी भागातल्या डी एन नगर असा हा मेट्रोचा टप्पा असणार आहे. 

भूमिपूजन कार्यक्रमानंतर भाषणामधून बोलताना, २०१९पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची प्रशंसा केली. सोबतच राज्यातल्या फडणवीस सरकारनं राबवलेल्या जलयुक्त शिवारचंही त्यांनी कौतुक केलं. तर आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन करण्याचं पवित्र कार्य आमच्याच हातून घडायचं होतं असं सांगत, विरोधकांसोबतच मित्रपक्ष शिवसेनेलाही टोला लगावला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.