मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं बंड अखेर थंड झालं आहे. कारण यापुढेही आपण काँग्रेसमध्ये काम करू असं नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस पक्षात आपला योग्य तो सन्मान राखला जाईल, असं आश्वासन आपल्याला पक्षश्रेष्ठींनी दिलं असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे. तसेच उद्यापासून आपण काँग्रेसच्या प्रचाराला लागणार असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलंय.
माझी मागील दोन दिवसांपासून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू होती, काँग्रेसच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण इतर पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नव्हतो, आपण पदाचा राजीनामा दिला होता, पक्षाचा नाही, असंही नारायण राणे यांनी एकदा निक्षून सांगितलं आहे.
मी पदांच्या मागे नाही, तर पदं माझ्या मागे आली असंही नारायण राणे यांनी आपल्या शैलीत सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुका सामूहिक नेतृत्वात होणार असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.