'विकलेला, पण तुम्हाला नको असलेला माल दुकानदाराला घेणे बंधनकारक'

ग्राहक न्यायालयाने दुकानदारांचा चपराक लगावली आहे. एकदा विकलेला माल अथवा वस्तू सदोष असताना दुकानदाराने परत घेणे बंधनकारक आहे, तसा निर्णय महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलाय.

Updated: Aug 5, 2014, 01:47 PM IST
'विकलेला, पण तुम्हाला नको असलेला माल दुकानदाराला घेणे बंधनकारक' title=
फाईल फोटो

मुंबई : ग्राहक न्यायालयाने दुकानदारांचा चपराक लगावली आहे. एकदा विकलेला माल अथवा वस्तू सदोष असताना दुकानदाराने परत घेणे बंधनकारक आहे, तसा निर्णय महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलाय.

 

दुकानदाराने सदोष अथवा कमी प्रतीची वस्तू परत न घेणे किंवा बदलून न देणे बेकायदा आहे, असा निकाल महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. याबाबत पवई येथील दुकानदार यांनी एक तक्रार दाखल केली होती.
  
मुंबईतील पवई आयआयटीमध्ये नोकरी करणारे आणि तेथेच कॅम्पसमध्ये राहणारे प्रेम तुकाराम लोके यांनी केलेले अपील मंजूर करण्यात आले. राज्य आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. सी. चव्हाण, सदस्य धनराज खामतकर यांनी हा आदेश दिला.

पवई येथील महाराष्ट्र फॅमिली शोरूमचे मालक नरपत एस. पुरोहित यांनी लोके यांना त्यांनी परत केलेल्या मालाची संपूर्ण रक्कम (रु. ३,०५०) व एक हजार रुपये भरपाई चार आठवड्यात द्यायची आहे. अन्यथा, त्यावर ९ टक्के दराने व्याज लागू होईल, असे आपल्या आदेशात म्हटले आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र फॅमिली शोरूममधून दोन पँट आणि दोन शर्ट खरेदी केले होते. १० टक्के सूट वजा करून लोके यांनी या कपड्यांसाठी एकूण ३,०५० रुपये दिले. दुसर्‍या दिवशी लोके कपडे बदलून घेण्यासाठी पुन्हा त्या दुकानात गेले. पण, दुकानदाराने बदली म्हणून दाखवलेल्या कपड्यांच्या दर्जाने समाधान न झाल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली; परंतु दुकानदार पुरोहित यांनी पैसे देण्यास नकार दिला.

वकिलाची नोटीस देऊनही दुकानदार दाद देईना तेव्हा त्यांनी मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली; परंतु एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, अशी अट दुकानदाराने बिलावरच छापलेली होती, यावर बोट ठेवून जिल्हा मंचाने तक्रार फेटाळली होती. 

राज्य आयोगाकडे अपील केल्यावर लोके यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे एक पत्र निदर्शनास आणले. 'एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही किंवा बदलूनही दिला जाणार नाही', अशी अट दुकानदारांनी त्यांच्या पावतीवर अथवा बिलावर छापण्यास बंदी आहे. 

राज्य आयोगाने लोके यांच्या अपिलावर नोटीस काढताच दुकानदार पुरोहित वकिलासह हजर झाले व त्यांनी लोके यांना सर्व पैसे परत करण्याची स्वत:हून तयारी दर्शविली. आयोगाने त्याखेरीज एक हजार रुपये भरपाई देण्याचाही आदेश दुकानदारास दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.