मुंबई : कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी बलिप्रतिपदा येते. आज बलिप्रतिपदा असून या दिवशी विक्रम संवत् २०७३ किलकनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. याला ' दिवाळी पाडवा ' असेही म्हणतात.
बलिप्रतिपदा हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि त्याला शुभेच्छा देते. पती पत्नीला भेटवस्तू देतो. पती-पत्नीचे प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आहे.
व्यापारी लोक यादिवशी शुभवेल- शुभचौघडी पाहून पूजन केलेल्या वहीमध्ये हिशेब लिहीण्यास प्रारंभ करतात. महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्ये ' अन्नकूट ' केले जाते. प्रत्येक जण आपापल्या घरून एक खाद्यपदार्थ मंदिरात घेऊन येतो. आणि एकत्र बसून सर्वजण प्रसाद म्हणून खातात. सहभोजनाची ही पद्धत फार प्राचीन कालापासून महाराष्ट्रात चालत आलेली आहे.
बलिप्रतिपदेच्या दिवशी आप्तेष्ट मित्रांना मिठाई देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. नवीन विक्रम संवताच्या या पहिल्या दिवशी सकाळी मीठ खरेदी करण्याचीही प्रथा आहे.