नवी दिल्ली : एनडीएच्या बैठकीआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनीटं चर्चा झाली आहे.
येत्या जुलै महिन्यात होत असलेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा मुद्दा बैठकीच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत शिवसेना भाजप संबंध सुरळीत करण्यावरही चर्चा होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
अनेक राष्ट्रीय विषयांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजेच जवळपास मे २०१४ नंतर तीन वर्षांनी उद्धव ठाकरे आणि मोदी-शहा दिल्लीमध्ये भेटतील.
याआधी दोनवेळा उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन गेले होते. यावेळी त्यांनी राजनाथ सिंह आणि अरुण जेटली यांची भेट घेतली होती. अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली होती.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातले भाजपचे दोन ज्येष्ठ मंत्री 'मातोश्री'वर सदिच्छा भेटीसाठी जाणार होते. मात्र NDA बैठकीच्या निमित्तानं जर पक्षश्रेष्ठी स्तरावरच शिवसेनेशी संबंध मधुर करण्यासठी प्रयत्न होण्याचे संकेत मिळाल्याने मंत्र्यानी त्यावेळी 'मातोश्री' पुढे ढकलली.