'...अन्यथा मिळणार नाही परीक्षा केंद्रात प्रवेश' दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी अपडेट

Maharashtra SSC Admit Card 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  

Pravin Dabholkar | Updated: Jan 20, 2025, 04:46 PM IST
'...अन्यथा मिळणार नाही परीक्षा केंद्रात प्रवेश' दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी अपडेट title=
दहावी प्रवेशपत्र

Maharashtra SSC Admit Card 2025: काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. शाळांना अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करून विद्यार्थ्यांच्या वतीने प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आपले हॉलतिकीट शाळा अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागतील. अधिकृत वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट घेऊन जाणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षेचा पहिला पेपर भाषा विषयाचा असेल तर सामाजिक विज्ञान विषयाचा पेपर शेवटचा असेल. दहावीची परीक्षा 2 शिफ्टमध्ये होणार आहेत. सकाळच्या शिफ्टची परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर दुपारच्या शिफ्टची परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल. असे असले तरी काही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आली आहे.

दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल? 

दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या वतीने हॉल तिकीट डाउनलोड करू शकते. यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जा. होमपेजवर उपलब्ध असलेल्या एसएससी हॉल तिकीट 2025 लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करा. महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती विद्यार्थ्यांना वितरीत करा. 

हॉलतिकीट दुरुस्ती तपशील 

अधिकृत नोटिफिकेशननुसार, महाराष्ट्र बोर्ड एसएससी हॉल तिकीट 2025 मध्ये दुरुस्त्या करता येतील. विद्यार्थ्याचे नाव, आईचे लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख किंवा जन्मस्थान यासारख्या काही क्षेत्रात चुका असतील तर तुम्ही बदल करू शकता. दुरुस्त्या करण्यासाठी, उमेदवारांना विहित शुल्क भरावे लागेल. विभागीय मंडळाच्या मंजुरीनंतर सुधारित महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 'सुधारणा प्रवेशपत्र' लिंकद्वारे डाउनलोड करता येईल. विषय किंवा माध्यमात बदल करण्यासाठी शाळांना थेट विभागीय मंडळाशी संपर्क साधावा लागेल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

दहावी, बारावीच्या हॉल तिकीटावरील 'तो' उल्लेख हटवणार

दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. त्यानंतर विविध घटकांतून महामंडळावर टीका करण्यात आली होती. हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याचं सांगत बोर्डाकडून त्याच समर्थन करण्यात आलं होतं. मात्र जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्यात आल्याचं राज्य शिक्षण मंडळाने म्हटलं आहे. बारावीसाठी नव्याने प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी 23 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा प्रवेश पत्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तर दहावीसाठी 20 जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. असे मंडळाने स्पष्ट केले आहे. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्याना समाजकल्याण तसंच, अन्य विभागांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी माहिती द्यावी लागले. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, पालकांचे नाव, जन्मतारिख, जात याबाबत शाळेच्या रजिस्टरमध्ये बदल करता येत नसल्याने मंडळाने प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख केला असल्याचे मंडळाने म्हटलं होतं.