बाप करोडोंचा मालक पण, मुलगा करतोय रोजंदारी!

आपल्या मुलानं आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावं... असं कोणत्या बापाला वाटणार नाही... पण, सोबतच आपल्या मुलानं स्वत: मेहनत करून यशस्वी व्हावं असं एका करोडपती बापाला वाटतंय. म्हणूनच त्यानं मुलाला 'आम आदमी' बनून कमवायला सांगितलंय. 

Updated: Jul 22, 2016, 08:17 PM IST
बाप करोडोंचा मालक पण, मुलगा करतोय रोजंदारी! title=
डावीकडे द्रव्य, उजवीकडे तरुणपणीचे सावजीभाई

नवी दिल्ली : आपल्या मुलानं आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावं... असं कोणत्या बापाला वाटणार नाही... पण, सोबतच आपल्या मुलानं स्वत: मेहनत करून यशस्वी व्हावं असं एका करोडपती बापाला वाटतंय. म्हणूनच त्यानं मुलाला 'आम आदमी' बनून कमवायला सांगितलंय. 

सावजी ढोलकिया हे नाव तुम्हाला लक्षात असेलच... कसं विसरणार... हे नाव तेव्हा चर्चेत आलं होतं जेव्हा आपल्या कंपनीच्या - 'हरिकृष्णा एक्सपोर्ट'च्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून कार आणि फ्लॅटस गिफ्ट म्हणून देण्यात आले होते. ही सावजी यांचीच कंपनी होती. 

Image source
द्रव्य ढोलकिया

एका बापाचं मुलाला चॅलेंज... 

सावजी यांचा २१ वर्षांचा मुलगा 'द्रव्य' हा सध्या अमेरिकेत मॅनेजमेंट शिकतोय. सध्या सुट्ट्यांसाठी तो भारतात आलाय. पण, 'बापकमाई'वर न जगता द्रव्यनं स्वत: मेहनत करावी आणि पैसे मिळवावेत, असं सावजींना वाटलं... त्यामुळे त्यांनी द्रव्यला एका महिन्यासाठी ७००० रुपये आणि ३ जोडी कपडे देऊन कोच्चीमध्ये पाठवलंय. 

इतकंच नाही तर त्याच्या या प्रवासातील काही अटीही आहेत...

- एका जागेवर एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ द्रव्यनं नोकरी करू नये... 

- जे ७००० रुपये त्याच्याकडे आहेत ते त्यानं आपत्कालीन परिस्थितीतच वापरावेत... 

- आपली ओळख कुणाकडेही उघड करू नये.

- या दरम्यान द्रव्यला मोबाईल वापरण्याची परवानगी नाही

Savji Dholakia
सावजी ढोलकिया

...पण कशासाठी?

आपल्या मुलाला आयुष्याचं मोल कळावं आणि गरीब लोक कशापद्धतीनं जगतात... नोकरी करतात... संघर्ष करतात... हे त्याला उमजावं यासाठी आपण त्याला हे चॅलेंज दिलंय... आणि द्रव्यनं ते मान्यही केलंय असं सावजी मोठ्या अभिमानानं सांगतात.

कसा होता द्रव्यचा हा प्रवास?

द्रव्यनंही आपल्या या प्रवासाबद्दल सांगताना, आपण पहिल्यांदा एका बेकरीत, त्यानंतर एका कॉल सेंटरमध्ये, बुटांच्या दुकानात आणि मॅकडॉनल्डमध्ये काम केल्याचं म्हटलंय. या महिन्याभरात तो ४००० रुपये कमावू शकलाय. अगोदर पैशांची चिंता वाटत नव्हती पण या महिन्याभरात मला जेवण्यासाठी ४० रुपये मिळवायलाही संघर्ष करावा लागला, असं द्रव्य सांगतोय. तो मंगळवारी पुन्हा आपल्या घरी परतलाय.