Nashik Ashram School: नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी डर्टी किचनमधील जेवण जेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इगतपुरीतून सेंट्रल किचनची आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक पाहणी केली असता तिथं किडक्या सडक्या भाज्यांपासून अन्न बनवलं जात असल्याचा प्रकार आमदार हिरामण खोसकर यांच्या लक्षात आलाय. या डर्टी किचनची आदिवासी विभागानं चौकशी सुरु केलीय.
आश्रम शाळांमध्ये निकृष्ट जेवण
सडका भाजीपाला, किडलेलं कडधान्य, सडलेले टोमॅटो, घाणेरडे बटाटे, मैदायुक्त आट्याच्या कच्च्या पोळ्या. नाशिक जिल्ह्यातल्या 44 आदिवासी आश्रम शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना अशा डर्टी सेंट्रल किचनमधून जेवण पुरवलं जातंय. सरकार आदिवासी मुलांच्या जेवणावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना गोरगरिब आदिवासी मुलांच्या ताटात हे असं निकृष्ट जेवण वाढलं जातय. राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरीच्या मुंडेगावातील सेंट्रल किचनची अचानक पाहणी केली त्यावेळी त्यांनी जी परिस्थिती पाहिली ती पाहून ते हादरुनच गेले.
कारवाई न केल्यास विधिमंडळ सभागृहात प्रवेश करणार नाही
राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अशी सेंट्रल किचन्स आहेत. त्यामध्येही अशीच परिस्थिती आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. तर काल अचानक मुलांनी मानधन वाढवून द्यावे यासाठी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मी सेंट्रल किचनची अचानक पाहणी केली. तेव्हा भयानक परिस्थिती समोर आली. ज्यामध्ये अन्न ठेवलेल्या ठिकाणी उंदीर खेळत होते. हे जेवण रस्त्यावरचा भिकारी माणूस सुद्धा खाणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हेच सुरु आहे. अधिकरी कंत्राट दारांना पाठीशी घालतात. याला आम्ही आदिवासी आमदार सुद्धा जबाबदार आहोत.
तेथील लोकांना विचारायला गेलो तर ते हप्ते सुरु आहे असे सांगतो. मग हे हप्ते कोणाला सुरु आहेत. आदिवासी आयुक्त, अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय. जोपर्यंत निकृष्ट जेवण पुरवणाऱ्या डर्टी किचनवर कारवाई होणार नाही तोपर्यंत विधिमंडळ सभागृहात प्रवेश करणार नसल्याचा निर्धार हिरामण खोसकरांनी केलाय.
याआधी आश्रमशाळा पातळीवर जेवण तयार केलं जायचं. ते जेवण निकृष्ट होतं म्हणून सेंट्रल किचनमधून आदिवासी विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्याचं कंत्राट देण्यात आलं. पण सेंट्रल किचनमध्येही विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण मिळू लागल्यानं विद्यार्थ्यांचा आरोग्यच धोक्यात आलंय असं म्हणावं लागेल.