www.24taas.com, नवी दिल्ली
गॅस सिलिंडर वेळेवर येत नाही... घरी गॅस सिलिंडर घेऊन आलेला कर्मचारी पैसे मागतो... वारंवार तक्रार करूनही उत्तरं मिळत नाहीत किंवा कारवाईही केली जात नाही... असे अनेक प्रश्न तुम्हालाही सतावत असतील तर आता तुम्ही तुमचा गॅस डीलरच बदलून टाकू शकता. कारण, आता ‘लक्ष्य’ या नावानं गॅस पोर्टेबिलिटी योजना सुरु करण्यात आलीय.
मोबाईल पोर्टेबिलिटीनंतर सरकारनं एलपीजी पोर्टेबिलिटी सुरू केलीय. यामुळे एलपीजी ग्राहकांनाही डीलर्स बदलण्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेत ग्राहकांना केवळ डीलर बदलण्याची सोय उपलब्ध आहे पण कंपनी मात्र कायम ठेवावी लागेल. म्हणजे, तुमच्या घरी ‘भारतगॅस’ कंपनीचा गॅस सिलिंडर येत असेल तर तुम्हाला परिसरातील याच कंपनीच्या इतर डीलर्सशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल.
चंदीगड येथे या एलपीजी डिस्ट्रिब्युटर पोर्टेबिलिटी योजनेचा (लक्ष्य) शुभारंभ करण्यात आलाय. आगामी आर्थिक वर्षात आणखी २५ जिल्ह्यांत या योजनेचा विस्तार करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी म्हटलंय. या योजनेन्वये एलपीजी ग्राहकांना हवा तो डिस्ट्रिब्युटर निवडण्याची मुभा मिळणार असल्याने डिस्ट्रिब्युटर्समध्ये स्पर्धा निर्माण होईल... डीलर्सची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकेल आणि सुविधा सुधारण्यास मदत होईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
एलपीजी पोर्टेबिलिटीसाठी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून वेब पोर्टलवर विनंती करता येऊ शकेल. नवीन कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. १३.५ कोटी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.