मतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर

निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 9, 2014, 08:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वर्धा
निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.

तिथे पाहिजे जातीचे... येऱ्या गबाळ्याचे काम नोहे... असं निवडणुकींच्या बाबतीत म्हटलं जातं, ते काही खोटं नव्हे... सर्वसामान्य माणूस राजकारणापासून दूर असतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याला या तिन्ही गोष्टी जमत नाहीत... ना तो पैशाचा पाऊस पाडू शकत, ना दारूचा पूर येत, ना आमिषांचा चिखल तयार करत...
देशात लोकसभा निवडणुकीचं रण माजलं असताना राजकारणाच्या या काळ्या बाजूही प्रकर्षानं समोर येतायत. मतदानाची तारीख जसजशी जवळ येते, तसतसा या प्रकारांना अधिक ऊत येत असतो. आचारसंहिता लागू झाल्यापासूनच राज्यभरात याचं दर्शन जागोजागी घडतंय. मग ते नोटा वाटताना सापडलेले कार्यकर्ते असोत की जप्त केलेल्या गाड्या... आणि गेल्या दोन दिवसांत विदर्भात उत्पादन शुल्क आणि पोलिसांच्या पथकांनी जप्त केलेली अवैध दारू असो...
चंद्रपूर, अकोल्यासह विदर्भामध्ये लाखो रुपयांची अवैध दारू गेल्या काही दिवसांमध्ये जप्त करण्यात आलीये.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील हॉटेल अमृत पेलेसमध्ये सुमारे १५ लाखांची रोकड पोलिसांनी मतदानाच्या आदल्या दिवशी जप्त केली. चिपळूणमध्ये शिलाई यंत्र आणि साड्यांचं वाटप होत असल्याचं समोर आलंय. अर्थात, हे हिमनगाचं केवळ एक अष्टमांश टोक आहे.
जितक्या गोष्टी समोर येतायत, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रत्यक्षात घडतायत. यावर वचक ठेवण्याची जबाबदारी जितकी निवडणूक आयोग आणि प्रशासनाची आहे, तितकीच ती तुमची-आमचीही आहे. आपण आपलं बहुमूल्य मत विकणं बंद केलं, तर आणि तरच या प्रकारांना संपूर्ण आळा बसू शकेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.