अच्छे दिन... पाक करणार 152 मच्छिमारांची सुटका

नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी 152 भारतीय मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 25, 2014, 10:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी 152 भारतीय मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचा धडा गिरवत श्रीलंकेनंही त्यांच्या ताब्यातील भारतीय मच्छिमारांची सुटका करणार असल्याचं म्हटलंय. श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्ष यांनी हे ट्विट केलंय.
सोमवारी, पंतप्रधान पदावर आरुढ होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हेदेखील उपस्थित राहणार आहेत. भारताच्या या निर्णयाला पाकिस्ताननंही एकप्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
सोडण्यात येणाऱ्यांपैकी बहुतेक मासेमार हे गुजरातचे आहेत. तसंच दीव दमन, दादर आणि नगर हवेली या ठिकाणांच्या अनेक मच्छिमारांचाही यात समावेश आहे. पाकिस्तानच्या जलहद्दीत चुकून प्रवेश केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या मासेमारांना घेण्यासाठी गुजरात सरकारचे विशेष पथक पंजाबच्या ‘वाघा बॉर्डर’वर पाठवण्यात आलीय.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्ताननं सद्भावना मोहिमेंतर्गत मलीर आणि कराचीच्या केंद्रीय कारागृहांमधून 337 भारतीय मच्छिमारांना मुक्त केलं होतं. यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावरही सद्भावने अंतर्गत 15 मच्छिमारांना सोडण्यात आलं होतं. भारतीय मच्छिमार कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, अजुनही 229 भारतीय मच्छिमार आणि जवळपास 780 भारतीय नौका पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्याचपद्धतीनं भारतीय तुरुंगातही जवळपास 200 पाकिस्तानी मच्छिमार आपल्या 150 नौकांसहीत बंदीस्त आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.