www.24taas.com, झी मीडिया, लंडन
अठराव्या शतकातील मैसूरचा शासक म्हणून राज्यकारभार हाताळलेल्या टीपू सुलतान याची ‘राम’ अशी अक्षरं कोरलेल्या अंगठीचा लिलाव नुकताच लंडनमध्ये पार पडलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अंगठीवर देवनागरी लिपित हिंदू देवाचं ‘राम’ हे नाव कोरलं गेलेलं आहे. ही अंगठी क्रिस्टीच्या लिलावघरात 1 लाख 45 हजार युरो (जवळपास 11 कोटी 56 लाख 73 हजार 53 रुपये) मध्ये विकली गेली.
लिलावघरातून मिळालेल्या माहितीनुसार, या अंगठीचं वजन 41.2 ग्रॅम होतं. अनुमानापेक्षा तब्बल 10 पटींनं या अंगठीला किंमत मिळाल्यानं सगळ्यांनीच आनंद व्यक्त केलाय.
ही अंगठी चौथं अँग्लो-मैसूर युद्धात (1798-1799 च्या दरम्यान) झालेल्या टीपू सुलतान याच्या मृत्यूनंतर त्यांच्या हातातून काढून घेण्यात आली असावी. हे युद्ध मैसूर राज्य आणि ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीमध्ये लढलं गेलं होतं.
एका मुस्लीम राजाच्या अंगठीवर ‘राम’ लिहिलं गेलंय, यावर बराच वाद उभा राहिला होता. टीपू सुलतान युनायटेड फ्रंटनं भारत सरकारकडे अंगठीचा लिलाव रोखण्यासाठी पाऊल उचलावं, यासाठी आग्रह केला होता. कारण, ही एक ऐतिहासिक निशाणी आहे. ‘अंगठीचा लिलाव होत असेल तरी भारतीयांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जावं’ अशी या संघटनेची मागणी होती. अंगठीला 2012मध्येच क्रिस्टीच्या लिलावाच्या यादीत मांडण्यात आलं होतं. परंतु, नंतर हे नाव बाजुला काढलं गेलं.
‘टायगर ऑफ म्हैसूर’ म्हणून ओळखल्या जाणारा टीपू सुलतान (20 नोव्हेंबर 1750 – 4 मे 1799) एक अभ्यासू, शूर आणि कवी होता. म्हैसूरचा सुलतान हैदर अली यांचा टीपू हा मोठा मुलगा होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.