www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय. तसंच मुख्यमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचंही कदम यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास पुण्यात विरोध प्रदर्शन करण्यात येईल, असा इशारा पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यानं प्रदेश काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीय. कोकण आणि नागपुरातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून आतापर्यंत उद्योगमंत्री नारायण राणे आणि रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय. दरम्यान, काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, यासाठीचा दबाव वाढू लागलाय.
तर माझ्या भवितव्याचा फैसला पक्षश्रेष्ठीच घेतील, असं मुख्यमंत्री चव्हाणांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे आक्रमक झालेत. या दोघा नेत्यांमध्ये शनिवारी जवळपास अर्धा तास गुप्त चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 2 जागा जिंकता आल्या. या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी पक्षाची बैठक बोलवावी, अशी मागणी केली जात आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
विश्वजीत कदम हे वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा बोलविता धनी कोण? यावर चर्चा रंगू लागली आहे. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी लाटेत भूईसपाट झालेल्या काँग्रेसमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची चिन्ह आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.