www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्सिं गमध्ये अडकलेल्या अंकित चव्हाहणच्या भावी पत्नीनं नेहा सांबरीनं त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आयटी कन्सलस्टंट असलेल्या नेहा रविवारी, २ जून रोजी अंकितसोबत विवाहबद्ध होत आहे. लग्नासाठी अंकितला जामीन मिळाला आहे. पण ६ जूनला त्याला पुन्हा पोलिसांसमोर शरणागती पत्करावी लागेल.
नेहाने गुरूवारी अंकितच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील घरूनच माध्यमांशी संवाद साधला. ‘माझा भावी पती निर्दोष आहे हे पुढील काळात सत्य बाहेर येईलच. मी १९ वर्षाची असल्यापासून अंकितला ओळखते. त्याचे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. त्यामुळे क्रिकेट व खेळाचे नुकसान होईल, असे काहीही करणार नाही. मी त्याला आयुष्यभरासाठी साथ देण्याचा निर्णय घेतलेला कायम आहे. तो एक साधा-सरळ माणूस आहे’
नेहा आणि अंकित मुंबईच्या डीजी रूपारेल कॉलेजमध्ये शिकले आहेत. याचवेळी दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्या काळापासून दोघे डेटिंगवर जायला लागले होते. गेल्या वर्षी या दोघांचा साखरपुडा झाला होता. अंकितला अटक झाल्यानंतरही नेहा अंकितच्या घरी जात येत होती व कुटुंबियांना धीर देत होती. नेहा म्हणते, ‘मी आणि अंकित केव्हाच एकमेकांचे झालो आहोत. आमचे कुटुंबीयही एकमेकांना जोडली गेली आहेत. खरं तर आमचे स्नेह कधीच जुळला आहे, लग्न ही औपचारिकता केवळ बाकी आहे. त्यामुळे अंकितशी संबंध तोडण्याचा काहीच संबंध नाही... मी त्याला गेल्या नऊ वर्षांपासून ओळखते. त्याच्या पडत्या काळात मी साथ दिली नाही तर कोण देणार? आमची दोन्ही कुटुंबं अंकितसोबत आहेत’.
अंकित चव्हाणला स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीशांत आणि चंडिला यांच्यासह १६ मेला अटक केली होती. तसेच तो सध्या दिल्लीतील एका जेलमध्ये आहे. शनिवारी म्हणजे आज अंकित जेलमधून सुटणार असून तो थेट मुंबईत दाखल होईल. रविवारी मुंबईत होणारा हा विवाहसोहळा साध्या पद्धतीने पार पडेल असे सांगितले जात आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार हा सोहळा धूमधाममध्ये होणार होता मात्र आता फिक्सिंगच्या आरोपामुळे अंकित-नेहाच्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.