www.24taas.com, विकास गावकर, सिंधुदुर्ग
कोकणात मासे खाण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर सावधान, गेल्या काही दिवसांपासून मासेच मिळत नसल्यानं, कोकणात मासे महागले आहेत.. याचा फटका पर्यटकांनाही सहन करावा लागतो आहे. लहरी हवामानाचा फटका आंबा काजूसोबत मत्स्योत्पादनाही बसतो आहे.
फळांचा राजा अशी ओळख असलेला कोकणचा हापूस आंबा यावर्षी दुरापास्त झाला आहे. हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं हापूस दिसेनासा झाला आहे. यात भर म्हणून की काय कोकणात यंदा मत्स खवय्यांचेही हाल सुरु झाले आहेत. वादळी वारा आणि मत्स्य दुष्काळामुळे समुद्रात मासेच मिळेनासे झाले आहेत.
उन्हाळ्या सुट्ट्या असल्यानं कोकणात निसर्गसौंदर्य आणि भरपूर मासे खाण्याच्या इच्छेनं आलेल्या पर्यटकांना या मत्स्यदुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. त्यातही मासे खायचेच असतील, तर त्यासाठी जादा किंमत मोजावी लागणार आहे. कोकणात यावर्षी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी कोकणच्या हक्काच्या हापूस अंब्यापासून आणि माशांपासून मात्र पर्यटकांना वंचित रहावं लागतं आहे.