झी 24 ताससाठी जळगावहून विकास भदाणे
जळगाव जिल्हा हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला...मात्र गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याला तडे जायला सुरूवात झाली. त्यातच खडसे-सुरेश जैन वादामुळं युतीमध्येही तणाव आहे. त्यामुळं आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जैन विरुद्ध खडसे विरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यातला सामना रंगणार आहे....
जळगाव जिल्ह्यातला एकनाथ खडसे आणि सुरेश जैन यांच्यातला वाद गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय. काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुरेश जैन यांनी राष्ठ्रवादी काँग्रेसचे बंडखोर मनिष जैन यांना मदत करत खडसेंच्या मुलाला आस्मान दाखवलं. अगदी राज्यपातळीवरच्या नेत्यांनी मध्यस्थी करुनही खडसे-जैन वाद मिटला नाही. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही तो मिटण्याची चिन्ह नाहीत. गेल्या 15 वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेवर भाजप शिवसेनेची सत्ता आहे.
गेल्या वेळी भाजपला 26 शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 16, काँग्रेसला 09 तर दोन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. खडसे-जैन वादामुळं दोन्ही पक्षांनी झेडपीत स्वबळावर लढण्याची तयारी केलीय.
दुसरीकडं गेल्या पंधरा वर्षातली युतीची सत्ता उलथवण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत अनुकुलता असल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव देवकर करतायेत.
गेल्या विधानसभा आणि नगरपालिकाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलीय. मात्र राष्ठ्रवादीला पक्षांतर्गत मतभेदानं ग्रासलंय. त्यातून ते कसे मार्ग काढतात यावरच निवडणुकीची गणितं अवलंबून आहेत.