Uddhav Thackeray Live: माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे.

Updated: Jun 22, 2022, 06:01 PM IST
Uddhav Thackeray Live: माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर... title=

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज जनतेशी संवाद साधला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकार संकटात आलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसं अजून तरी त्यांनी जाहीर केलेलं नाही.

'कोणताही अनुभव नसताना जिद्दीने जबाबदारी पार पडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात 25 वर्ष लढलो. नंतर जे घडलं ते सर्वांना माहित आहे. पवार साहेब म्हणाले जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. महापालिकेत न गेलेला माणूस मुख्यमंत्री कसा होईल. पवार साहेब आणि सोनिया गांधी यांनी विश्वास दिला.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर मग काय बोलणार. असं होतं तर इथे बोलण्यात काय हरकत होती. सुरत जाण्याची काय गरज होती. मला कोणताही मोह नाही. खूर्चीला चिकटून बसणारा नाही. माझा समोर येऊन बोला. शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही नुसतं असं बोलू नका.'

'मी राजीनामा द्यायला तयार आहे. ही लाचारी किंवा मजबुरी तर अजिबात नाही. आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. शिवसैनिकांना ही आवाहन करत आहे. काही लोकं आरोप करताय की बाळासाहेबांची शिवसेना राहिलेला नाही. मी शिवसैनिकांना बांधिल आहे. त्यांनी सांगावं काय करावे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदाने मानेनं. ते ही मला मान्य आहे.'

'पद येत असतात जात असतात. मुख्यमंत्रीपदा अनपेक्षितपणे आलं. संख्या कोणाकडे किती आहे हे गौण आहे माझ्यासाठी. मी ज्यांना माझे मानतो त्यापैकी किती माझ्याविरोधात मतदान करतील तर ही माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असेल.'