President Election: भाजप उमेदवाराला पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंकडे या शिवसेना खासदाराची मागणी

राष्ट्रपतीपदासाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.

Updated: Jul 5, 2022, 08:21 PM IST
President Election: भाजप उमेदवाराला पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंकडे या शिवसेना खासदाराची मागणी title=

मुंबई : देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. यासाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर केलीये. त्या एनडीएच्या उमेदवार असणार आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणत यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शिवसेनेतून 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेने फुटीच्या मार्गावर आहे. शिवसेनेत आता शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. असं असतानाच आता शिवसेनेच्या एका खासदाराने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा. अशी मागणी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र देखील लिहिलं आहे.

आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं की, आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा.

खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याआधी शिवसेना एनडीएमध्ये असताना ही त्यांनी यूपीएचे उमेदवार प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. पण आता एनडीएचा भाग नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.