Balasaheb Thackeray Smrutidin : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी (Shivsainik) गर्दी केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच शिंदे आणि ठाकरे गटात (Shinde Group vs Thackeray Group) जोरदार राडा झाला. त्यामुळे शिवाजी पार्कवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला होता. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर काल बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घातल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली. तसंच कालचा विरोध हा ट्रेलर आणि 2024 ची तयारी असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिलीय. तर बाळासाहेबांविरोधात घाणेरडे लेख लिहिणाऱ्या राऊतांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत असा टोला नितेश राणेंनी लगावलाय.
भाजपाच्या मागणीने नवा वाद
स्मृतीस्थळावरचा वाद निवळत नाही तोच आता भाजपने केलेल्या एका मागणीने नव्या वादाला तोंड फुटलंय. बाळासाहेबांच्या स्मृतिदनी पोस्ट करत मातोश्री बंगला जनतेसाठी खुले करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलीय. भाजप आमदार राम कदम यांनी सोशल मीडियात पोस्ट करत ही मागणी केलीय..बाळासाहेबांनी अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात घेतले तेच खरं जिवंत स्मारक जनतेसाठी खुलं का नाही असा सवाल राम कदमांनी विचारलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले ,तो बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा अशी राम कदम यांची मागणी आहे.
बाळासाहेब राहत असलेली मातोश्री ही वास्तू खऱ्या अर्थाने देशभरातल्या जनतेसाठी प्रेरक आहे. त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचं ऑफिस, त्यांची राहण्याची खोली सर्वच काही सामान्य जनतेसाठी प्रेरक आहे. ही वास्तू स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी कोणतीही सबब न देता उद्धवजी कधी खुली करणार? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे आता मातोश्री-2 वर राहातात त्यामुळे ज्या बंगल्यात बाळासाहेबांनी धाडसी निर्णय घेतले तो बंगला स्मारक म्हणून जनतेसाठी खुलं करावं अशी मागणीही राम कदम यांनी केलीय.
कसा आहे मातोश्री बंगला?
वांद्रे पूर्वच्या कलानगरमध्ये स्थित तीन मजली बंगला आहे. 1980 च्या दशकात बाळासाहेब कुटुंबासह इथे राहायला आले. युती सरकार असताना ग्राऊंड फ्लोअरमध्ये बदल करत तीन मजले बांधण्यात आले. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर उद्धव ठाकरे राहतात. मातोश्री हा बंगला अनेक ऐतिहासिक राजकीय घडामोडींचा साक्षीदार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक व्हावं अशी मागणी होऊ लागली आहे. फडणवीस सरकार असताना मुंबईतील दादरचा महापौर बंगला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी महापौरांचं निवासस्थान भायखळ्याला हलवण्यात आलं होतं. असं असताना आता भाजपनं 'मातोश्री' बंगला हेच स्मारक व्हावं, अशी मागणी केल्यामुळं भुवया उंचावल्या आहेत.