Lower Paral Delil Bridge: लोअर परळ येथील डिलाईल पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पथदिवे, लेन मार्किंग, रंगकाम ही अंतिम कामे लवकरात लवकर पूर्ण करून येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी पूल विभागाला दिले आहेत. त्यामुळे या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.
दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय असणाऱ्या डिलाईल पुलाच्या कामाला गती मिळावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सातत्याने निर्देश दिले आहेत.
या प्रकल्पाच्या पूर्ततेवर लक्ष ठेवून कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी त्यांनी पूल विभागाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रकल्पाच्या ठिकाणी अतिशय वेगाने कामे सुरू आहेत. पुलाच्या कामातील अंतिम किरकोळ कामेदेखील आता पुर्णत्वाकडे येत आहेत, असे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले.
डिलाईल पुलाच्या बांधणीमध्ये रेल्वे परिसराला जोडून असणारे ना.म. जोशी मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेचे गर्डर टाकण्याचे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यापाठोपाठच मास्टिक, रॅम्प, कॉंक्रिटीकरण, पथदिव्याची कामे हाती घेण्यात आली होती. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाले आहे. आता पथदिवे, रंगकाम, लेन मार्किंग, सिग्नल यंत्रणा आदी कामे सुरु आहेत. या कामांच्या पूर्ततेनंतर हा पूल वाहतूकीसाठी येत्या 3 ते 4 दिवसात खुला करणे शक्य होईल, अशी माहिती उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.
रोमन लिपीतील ‘टी’ आकारात असलेल्या डिलाईल पुलाच्या लोअर परळ स्थानकाच्या पश्चिम दिशेची गणपतराव कदम मार्ग ते ना. म. जोशी मार्ग असा वाहतूकीचा पर्याय देणारी बाजू याआधीच जून महिन्यात खुली करण्यात आली होती. त्यानंतर लोअर परळचा डिलाईल पूलाच्या एका मार्गिकेचे काम दिनांक 18 सप्टेंबर रोजी रोजी पूर्ण झाले होते व मार्गिका दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती.