Mumbai Local Train News: लोकल ट्रेनमधील सीटवरुन महिलांमध्ये होणारी भांडणे आपण नेहमीच पाहतो. मात्र, सीटवरुन झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने 35 वर्षांच्या प्रवाशाचा चाकुने वार करत खून केला आहे. या प्रकरणात कुर्ला जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे नाव अंकुश भालेवार असं आहे. भालेरावच्या हत्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला आणि घटनास्थळावरुन पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांवरुन त्याच्या मोठ्या भावाला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाला डोंगरीच्या बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीचा भाऊ मोहम्मद सनाउल्लाह शेख उर्फ सोहेलला स्थानिक कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कुर्ला जीआरपीनुसार, अंकुश भालेवारने 14 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घाटकोपरला पोहोचण्यासाठी टिटवाळा फास्ट लोकल पकडली होती. या दरम्यान सीटवर बसण्यावरुन त्याचे 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत वाद झाला होता. तेव्हा अंकुश आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन प्रवाशांनी अल्पवयीन मुलाला मारहाण केली. त्याचाच राग आरोपीच्या मनात होता.
दुसऱ्या दिवशी अंकुश नेहमीप्रमाणे घाटकोपर स्थानकातून लोकल पकडत असताना त्याच्यावर अज्ञात लोकांनी चाकूने हल्ला केला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयसीयुती शिफ्ट करण्यात आले. उपचारादरम्यान 15 नोव्हेंबर रोजी अंकुशचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांनी आणि पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अंकुशच्या मृत्यूचा तपास सुरू केला. तेव्हा त्यांना तिथे दोन मुलं संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळली. पोलिसांनी कसून चौकशी करताच त्यांनी गोवंडीतून मोहम्मद सन्नाउल्लाह उर्फ सोहेलला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने खुलासा केला की, त्याच्या 16 वर्षांचा भाऊ अंकुश भालेराववर चाकुने हल्ला करण्यात आला.
अंकुशवर हल्ला केल्यानंतर तो चाकू त्याने घरातच लपवून ठेवला होता. तसंच, अटकेपासून वाचण्यासाठी त्याने केस कापून वेषांतर करुन फिरत होता. कुर्ला जीआरपीचे वरिष्ठ पीआय संभाजी यादव यांनी म्हटलं आहे की, अंकुश हत्याकांड प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.