...अन् तो फडणवीसांना उचलून घेत नाचू लागला; भन्नाट Video Viral

Maharashtra Assembly Election 2024 Watch Devendra Fadnavis Lifted: महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांना चक्क उचलून घेत सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 24, 2024, 09:43 AM IST
...अन् तो फडणवीसांना उचलून घेत नाचू लागला; भन्नाट Video Viral title=
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Assembly Election 2024 Watch Devendra Fadnavis Lifted: शनिवारी लागलेल्या विधानसभेच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांनी अभूतपूर्व यश संपादित केलं आहे. 288 पैकी महायुतीने 235 जागा मिळवत विक्रमी कामगिरी केली. एकट्या भाजपाने 132 जागांवर विजय मिळवला असून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर विजय मिळवला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागी यश मिळवत भाजपाला उत्तम साथ दिली आहे. या विजयाने महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते शरद पवारांबरोबरच काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना महायुतीने जोरदार धक्का दिला आहे. या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन शनिवारी महाराष्ट्रातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाल्याचं पाहायला मिळालं. 

कसला फायदा कसला फटका?

एकत्र केलेलं काम, योग्य जागा वाटप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे यासारख्या घोषणा अशा साऱ्याच गोष्टी भाजपा आणि मित्र पक्षांसाठी जिळून आल्या. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहून गेलेली मदतही या विजयामध्ये मोलाची ठरल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे जागावाटपामधील गोंधळ, एकवाक्यतेचा आभाव, एकमेकांमधील हेवे-दावे याचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचं दिसून आलं. शरद पवारांच्या पक्षाची स्थापना झाल्यानंतरची यंदा सर्वात वाईट कामगिरी ठरली. एक अपवाद वगळता शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ते 25 जागांच्या खाली आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदाच एकाही आमदार निवडून आलेला नाही. 

शिल्पकार फडणवीस असल्याचा दावा

या विजयाचे प्रमुख शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा भाजपाच्या नेत्यांसहीत कार्यकर्त्यांचा दावा आहे. फडणवीस यांनी हा पक्षाचा आणि संघटनेचा विजय असल्याचं सांगत मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाबरोबर तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर घेतला जाईल असं सांगितलं. दरम्यान, कार्यकर्त्यांकडून फडणवीसांनाच ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या तत्वानुसार मुख्यमंत्री केलं जावं अशी मागणी होत आहे. एकीकडे फडणवीसांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पहिलं जात असतानाच दुसरीकडे मुंबईतील सेलिब्रेशनदरम्यान फडणवीसांना चक्क उचलून घेत नाचत सेलिब्रेशन केल्याचं दिसून आलं.

उचलून घेतलं अन्...

झालं असं की, मुंबईमधील भाजपा कार्यालयामध्ये फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी पक्षाचे सदस्य असलेले मोहित कंबोज आले होते. त्यावेळी खुर्चीवर बसलेल्या फडणवीसांशी हस्तांदोलन करत त्यांना कंबोज यांनी शुभेच्छा दिल्यानंतर फडणवीस उभे राहीले. त्यावेळेस कंबोज यांनी अचानक फडणवीसांना उचलून घेतलं आणि ते जागेवरच नाचू लागले. हे सारं घडत असतानाच फडणवीस केवळ हसत होते. त्यानंतर कंबोज यांनी आपला मोर्चा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे वळवला. त्यांनाही उचलून घेत कंबोज यांनी डान्स केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, संध्याकाळी फडणवीसांचं नागपूरमध्ये जंगी स्वागत करत सेलिब्रेशन करण्यात आलं.