Milk Price Hike : सप्टेंबर महिन्यापासून होणाऱ्या सुट्ट्या दुधाच्या दरामध्ये (Milk Price) वाढ होणार असल्याने सामान्य मुंबईकरांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. मुंबईत पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या आधीच मुंबई दूध उत्पादक संघाने (एमएमपीए) 1 सप्टेंबरपासून शहरातील म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर 2 रुपये दरवाढ जाहीर केली आहे. एमएमपीएच्या (MMPA) अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे.
टोमॅटो, कांदा आणि सुट्ट्या दुधाचेही दर वाढल्याने सामान्यांचे टेंन्शन वाढलं आहे. पुढील महिन्यापासून मुंबईत सुट्ट्या दुधाचे दर वाढणार आहेत. ओला चारा व पशूखाद्यांच्या दरात वाढ झाल्याने मुंबई दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुट्टे दूध महागणार आहे. म्हशीचे सुटे दूध रिटेलमध्ये प्रति लिटर 2 ते 3 रुपयांनी महागणार आहे. तर होलसेल दरातही दोन रुपयांची वाढ होणार आहे.
मुंबईत जवळपास 700 दूध डेअरी मालक व 50 हजार म्हशींचे मालक यांच्या मुंबई दूध संघाची शनिवारी जोगेश्वरी येथे बैठक पार पडली. या बैठकीत दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमपीएचे उपाध्यक्ष रमेश दुबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामुळे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी इत्यादी सणांमध्ये दुधाशी संबंधित सर्व खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
"देशाच्या व्यावसायिक राजधानीत 3,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांद्वारे विकल्या जाणार्या म्हशीच्या दुधाची किंमत 85 रुपये प्रति लीटरवरून 87 रुपये प्रति लीटर केली जाईल आणि ती सहा महिन्यांसाठी लागू राहील, त्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल. 1 सप्टेंबरपासून 2 रुपये/लिटर किंवा 85 रुपये/लिटर वरून 87 रुपये/लिटरच्या दरात वाढ झाल्याने, किरकोळ दर 90 रुपये/लिटरपर्यंत किंवा 95 रुपये/लिटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती एमएमपीए समितीचे सदस्य सी.के. सिंग यांनी दिली.
म्हशीच्या दुधात 1 मार्च नंतर दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा झालेल्या दरवाढीमुळे दुधाच्या मागणीवरही विपरित परिणाम होणार आहे. मुंबई दररोज 50 लाख लिटरहून अधिक म्हशीच्या दुधाचा पुरवठा केला जातो. यापैकी 700,000 लीटर पेक्षा जास्त दूध हे एमएमपीएच्या डेअरी आणि संबधित लोकांकडून पुरवलं जाते.