मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; २४ पैकी १७ विभागातील परिस्थिती सुधारली

काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्याही खाली आहे. 

Updated: Jul 14, 2020, 05:23 PM IST
मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; २४ पैकी १७ विभागातील परिस्थिती सुधारली title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थिती आता दिवसेंदिवस सुधारताना दिसत आहे. कालच मुंबईतील कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मंगळवारी मुंबईतून आणखी एक समाधानकारक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या २४ विभागांपैकी १७ विभागातील कोरोना रुग्णावाढीचा वेग आता दीड टक्क्याच्या खाली आला आहे. यापैकी काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्याही खाली आहे. सध्याच्या घडीला या १७ विभागांमध्ये १.३४ टक्क्याच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. तर उर्वरित सात विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर २.५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 

आनंदाची बातमी: मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढले

याशिवाय, मुंबईतीलो कोरोनाचा डबलिंग रेट महानगपालिकेने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षाही वर जाऊन पोहोचला आहे. सध्या मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५२ दिवस इतका आहे. यामध्ये एच पूर्व विभागाची लक्षणीय कामगिरी सुरूच असून या विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल १६४ दिवसांचा झाला आहे. तर रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता ०.४ टक्के असा सर्वात कमी आहे. एच पूर्व विभागात वांद्रे पूर्व, वाकोला, कलानगर आणि सांताक्रुझ या भागांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर १ जुलै  रोजी १.६८ टक्के होता. हा दर १२ जुलै रोजी १.३६ टक्क्यांपर्यंत घसरला. याचाच अर्थ रुग्ण वाढ मंदावत असून प्रशासन आपले घोषित लक्ष्य गाठण्यात यशस्वी होताना दिसत आहे. 

#Coronavirus धारावीतून आणखी एक आनंदाची बातमी