मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सद्यस्थितीतल्या राजकारणावर ट्विट करत आजही भाष्य केले आहे. इतिहास हा भूतकाळातील राजकारण आहे आणि राजकारण हे आजचा इतिहास आहे, असं ट्विट राऊत यांनी केले आहे.
तसेच अजित पवार यांच्यावर दैनिक 'सामना'तून जोरदार टीका करण्यात आली आहे. अजित पवारांचं बंड फसले आहे. आणि भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय असे सांगत 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपात भाजपाने एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे अशी जोरदार टीका 'सामना'ने केलीय.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 25, 2019
दरम्यान, राष्ट्रवादीचे तीन आमदार माघारी आल्याने पुन्हा अजित पवार एकटे पडलेले दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन आमदार पक्षात परत आले आहेत. अनिल भाईदास पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ हे तिघेही दिल्लीहून मुंबईला परत आले आहेत. गुडगावमधल्या हॉटेल हयातमध्ये या आमदारांना ठेवण्यात आलं होते. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया धुगन यांनी या आमदारांना मुंबईत आणलं. अजित पवारांसोबत आता केवळ पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. त्यामुळे अण्णा बनसोडेही पक्षात परतणार की अजित पवारांसोबतच राहणार याकडे लक्ष आहे.
तर दुसरीकडे अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही अजित पवारांच्या मनधरणीसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवायला तयार आहे. रविवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. चर्चेचे मूळ होते ते अजित पवार. अजित पवारांचे मनधरणीचे प्रयत्न राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांनी केले. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आता शिवसेनेने अजित पवारांच्या मनधरणीसाठी ब्रह्मास्त्र वापरायचे ठरवले आहे. त्यामुळे राजकारणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.