नव्या सरकारचा शपथविधी उद्या? पण सरकार स्थापन होतं कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. आजा नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 24, 2024, 09:10 AM IST
 नव्या सरकारचा शपथविधी उद्या? पण सरकार स्थापन होतं कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया title=
Maharashtra Assembly Election How is a new government formed Process oath taking

Maharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात महायुतीने मुसंडी मारली आहे. महायुतीने 226 जागांचा आकडा पार करुन बहुमत मिळवले आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर 57 जागांवर शिंदेसेनेवर गुलाल उधळला आहे तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. सरकार कसं स्थापन होईल, हे जाणून घेऊया. 

सरकार कसं स्थापन होईल?

मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळं महायुतीकडून सरकारस्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून केंद्रीय निरीक्षकाची नेमणूक होईल. केंद्रीय निरीक्षक नेमणूक झाल्यावर भाजपची अंतर्गंत बैठक होईल. या बैठकीत भाजपचा गटनेता निवडला जाईल. गटनेता निवडीनंतर भाजपा गटनेते हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करतील. राज्यपाल सरकार स्थापनेचे निमंत्रण देतील नंतरच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीहून केंद्रीय भाजपकडून 2 निरीक्षक पाठवले जाणार आहेत. विधीमंडळ नेता निवडीनंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे पत्र दिल्यानंतर भाजप दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

राष्ट्रवादीची आज बैठक

आज सकाळी 11च्या सुमारास राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या विधीमंडळ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नेता निवडला जाणार असून देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे. पक्षातील विजयी उमेदवारांना आपले प्रमाणपत्र घेऊन येण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. 

महायुती सरकारचा शपथविधी शिवाजी पार्कवर ?

नव्या सरकारच्या शपथविधीसाठी महायुतीचा शिवाजी पार्कसाठी आग्रह असल्याचं कळतंय. उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळतेय. मात्र, राज्यपालांकडून अद्याप कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेचे निमंत्रण नसल्याची माहिती समोर येतेय.