नेत्यांच्या नातेवाईकांनीही मारली बाजी; भावा-भावांच्या 3 तर भाऊ-बहिणीच्या 2 जोड्या विधानसभेत

Maharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात महायुतीने मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत भावा-भावांच्या जोड्या विधानसेवर पोहोचल्या आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 24, 2024, 10:24 AM IST
नेत्यांच्या नातेवाईकांनीही मारली बाजी; भावा-भावांच्या 3 तर भाऊ-बहिणीच्या 2 जोड्या विधानसभेत title=
Maharashtra Assembly Election 2 pairs of siblings, 3 pairs of brothers win in Assembly Election

Maharashtra Vidhan Sabha Election Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भावांच्या तीन जोड्या आणि भाऊ-बहिणीं विधानसभेत पोहोचल्या आहेत. हे सर्व उमेदवार महायुतीचे उमेदवार होते.  कोण आहेत हे उमेदवार हे जाणून घेऊया. 

विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजपने 2024 मध्ये 149 जागांवर निवडणूक लढवत तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर, शिंदेसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या पक्षाला 41 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. तर, नेत्यांचे नातेवाईक जिंकले आहेत. 

- खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कणकवलीतून तर, निलेश राणे कुडाळमधून जिंकले आहेत. दोघे सख्खे भाऊ विधानसभेत जाणार आहेत. तर, राणेंच्या घरात एक खासदार आणि दोन आमदार अशी सत्ता असणार आहे. 

- शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत रत्नागिरीतून विजयी झाले तर त्यांचे बंधू किरण सामंत याच जिल्ह्यातून राजापूरमधून विजयी झाले आहेत. 

- वांद्रेपूर्वमधून वरुण सरदेसाई आणि वरळीतून आदित्य ठाकरे हे विजयी झाले आहेत. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ आहेत. रश्मी ठाकरे यांच्या मोठ्या बहिणीचे ते पुत्र आहेत. 

- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दिलीप वळसे पाटील हे आंबेगावमधून तर त्यांची बहीण सईताई डहाके या कारंजामधून भाजपकडून विजयी झाल्या आहेत. 

- रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदनमधून विजयी झाले आहेत. तर, कन्या संजना जाधव या शिंदेसेनेकडून कन्नडमधून विजयी झाल्या आहेत. 

- भाजपचे शिवाजीराव कार्डिले राहुरीमधून जिंकले आहेत तर त्यांचे जावई संग्राम जगताप अहमदनगर शहरमधून विजयी झाले आहेत. 

महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी वयाचा आमदार निवडून आला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित पाटील यांचे वय 25 वर्षे असून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.