Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतल्या (Mahayuti) सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. राज्यभरात प्रचार दौरे सुरु झाले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालीय. मात्र कळीचा मुद्दा ठरलाय तो जागावाटपाचा. महायुतीचं जागावाटप (Seat Allocation) अजूनही ठरलेलं नाही. 48 लोकसभा जागांवर कोण कुठून लढणार याची वाटणी अजून झालेली नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena Shinde Group) 22 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Ajit Pawar Group) 10 जागांची मागणी केलीय. त्यामुळे भाजपवरही मोठा दबाव आहे. महायुतीत असे अनेक मतदारसंघ जिथे तीनही पक्षांनी आपापला दावा ठोकलाय.
या जागा ठरतायत कळीचा मुद्दा
धाराशिवच्या जागेवर तीनही पक्षांनी दावा केलाय. तर परभणीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद सुरु आहे. नाशिकच्या शिंदेंच्या जागेवरही भाजप इच्छुक आहे. सिंधुदुर्गात जागा शिंदे गटाची असली तरी भाजपचे नारायण राणे लढण्यासाठी इच्छुक आहेत. हिंगोलीत शिंदे गटाचे मराठवाड्यातले एकमेव खासदार आहेत. मात्र तिथेही भाजप पदाधिकाऱ्यांनी जागा मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवलंय. छत्रपती संभाजीनगरमध्येही शिंदे आणि भाजप यांच्यात वाद आहेत. बुलढाण्यात तर तिनही पक्षांनी दावा ठोकलाय. तर माढ्यामध्येही भाजप आणि अजित पवार गटामध्ये लढण्यावरुन वाद आहे. कोकणात रायगडमध्येही तीनही पक्षांनी दावा केलाय. तर उत्तर पश्चिम मुंबईत भाजप आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे...
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का देण्याची रणनीती आखलीय. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड संभाजीनगरमधून लढण्यासाठी इच्छूक आहेत. एकीकडे शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन वाद होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटही राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी आग्रही आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर अजित पवार गटाच्याही बैठका होतायत.
नाशिकमध्येही जागेवरुन तिढा
नाशिकचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघही राष्ट्रवादीला देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलीय.. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. कांदा निर्यातबंदीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात नाराजी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यास मदत होऊ शकते अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलीय. सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार, शिवसेनेचा एक तर भाजपचा एक आमदार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सध्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार या भाजपच्या खासदार आहेत...
धाराशिव, परभणी, नाशिक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, हिंगोली, संभाजीनगर, बुलडाणा, माढा, रायगड, उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांवरुन तीनही पक्षांमध्ये वाद आहेत. शिवसेना 22 जागा लढण्यावर ठाम आहे. अजित पवार गटाला 10 जागा पाहिजेत. तेव्हा आता अमित शाहाच हा तिढा कसा सोडवणार हे पाहावं लागणार आहे.