सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत

सुजय यांच्या भाजप प्रवेशाने टीकेला सुरुवात

Updated: Mar 13, 2019, 07:35 PM IST
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत title=

मुंबई : सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत सुरू झालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विखेंचे विरोधक बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल केला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाचा समोर येऊन सगळ्यात आधी निषेध करायला हवा होता अशा शब्दांत थोरातांनी टीका केली. काँग्रेसने विखे कुटुंबीयांना आतापर्यंत भरभरून दिलं. मात्र पुत्र हट्ट करतो म्हणून दुसऱ्या पक्षात जाणे हे विखेंना शोधणारं नाही असंही थोरातांनी म्हटलं आहे. तसंच राधाकृष्ण विखे राजीनामा देऊन भाजपत गेले तर विरोधी पक्षनेतेपद सांभाळण्यास तयार असल्याचंही थोरातांनी सांगितलं आहे. 

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानं सर्वाधिक कोंडी राधाकृष्ण विखे पाटलांची झाली आहे. भंडावून सोडणाऱ्या प्रश्नांची यादी त्यांच्यासमोर उभी आहे. मात्र तरीही विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुलाचा भाजप पक्षप्रवेश रोखू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांची पुरती गोची झाली.

भाजप प्रवेशानंतर उपस्थित होत असेलेले प्रश्न

१. नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील मुलाच्या विरोधात काँग्रेसचा प्रचार करणार का ?
२. मुलगा भाजपामध्ये गेलेला असताना राज्यात तरी राधाकृष्ण विखे पाटील,भाजपाविरोधात कुठल्या तोंडानं प्रचार करणार ?
३. विखे पाटलांनी भाजपावर केलेली टीका जनतेच्या पचनी कशी पडणार ?
४. सभागृहात तरी आता राधाकृष्ण विखे पाटील ताकदीनं राज्य सरकारविरोधात आवाज कसा उठवणार ?
५. राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातलं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतलं नाव होतं, आता हे नाव यादीत राहणार का ?

या विविध प्रश्नांनी राधाकृष्ण विखे पाटलांची पुरती कोंडी केली आहे. अशा परिस्थितीत टोले मारण्याची संधी शिवसेनेनंही सोडली नाही. सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे आघाडीतही ठिणगी पडली आहे. निवडून येईल तो उमेदवार, एवढ्या साध्या सूत्रावर भाजप कामाला लागली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एकेक जागेवरुन भांडत बसले आहेत. नगरची जागा न सोडल्यानं काँग्रेस प्रचंड दुखावली गेली. त्यामुळे राज्यभरात आघाडी झाली आहे पण कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय का, हा खरा प्रश्न आहे.