अमित जोशी, मुंबई : प्रत्यक्ष निवडणूक प्रचार सुरु होण्यासाठी एका महत्त्वाच्या मोहिमेवर शिवसेना - भाजपच्या नेत्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. आधी मनोमिलन आणि मग प्रचार असं लक्ष्य सेना -भाजपच्या नेत्यांनी ठेवलं आहे. म्हणूनच एकत्रित कामाचा संदेश देण्यासाठी संयुक्त मेळाव्यांचे आयोजन सेना - भाजपने केले आहे. तब्बल साडेचार वर्ष एकमेकांशी भांड भांड भांडल्यावर अखेर शिवसेना-भाजपाचं मनोमिलन झालं. नेत्यांमध्ये असलेला हा बेबनाव कार्यकर्त्यांमध्येही झिरपला होताच. त्यामुळे आता युती झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मनं जोडणं पुन्हा आवश्यक झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी रात्री मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या एकेका नेत्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोकणची जबाबदारी शिवसेनेकडून सुभाष देसाई तर भाजपकडून रविंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे.
ठाणे, कल्याण, पालघरसाठी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांवर जबाबदारी असेल.
पुणे, बारामती, शिरुर, माढा, सोलापूर, मावळसाठी नीलम गोऱ्हे आणि गिरीश बापट
उर्वरित पश्चिम महाराष्ट्रासाठी चंद्रकांत बानगुडे पाटील आणि चंद्रकांत पाटील असतील.
उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे दादा भुसे तर भाजपाचे गिरीश महाजन हे काम पाहतील.
तर मराठवाड्यात अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडेंना समन्वय बघावा लागणार आहे.
दुसरीकडे कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याची सवय व्हावी, यासाठी संयुक्त मेळाव्यांचीही आखणी करण्यात आली आहे.
१५ मार्च रोजी अमरावती आणि नागपुरात मेळावे होणार आहेत.
१७ मार्चला औरंगाबाद आणि नाशिक
दुसऱ्या दिवशी नवी मुंबई आणि पुण्यामध्ये मेळावे असतील.
काही मतदारसंघ असे आहेत की जिथं शिवसेना-भाजपच्या पक्षनेतृत्वाला अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ईशान्य मुंबई, जालना, पालघर, ठाणे, भंडारा-गोंदिया, लातुर, भिवंडी, दक्षिण मुंबई इथं खरी कसोटी लागणार आहे. संयुक्त मेळावे, समन्वयक या आधारे स्थानिक पातळीवरचे हेवेदावे मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी केला आहे. याला किती यश येतं यावर युतीचं यश अवलंबून आहे.